आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनियांकडून डॅमेज कंट्रोल पंतप्रधानांची तोंडभरून स्तुती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

थिरुवनंतपुरम- राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर केलेल्या टीकेमुळे उठलेले वादळ शांत करण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची तोंडभर स्तुती केली असून डॉ. सिंग यांच्या नेतृत्वात लागू करण्यात आलेल्या योजना लक्षावधी उपेक्षित लोकांसाठी महत्त्वपूर्ण ठरल्या असल्याचे प्रशस्तिपत्र त्यांनी दिले.

प्रत्येकच पातळीवर त्यांना (उपेक्षितांना) पक्षपाताला सामोरे जावे लागते. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वातील यूपीए सरकारने महत्त्वाच्या योजना लागू करून लक्षावधी उपेक्षितांचे कल्याण साधले, असे नेवरधाम येथील कार्यक्रमात सोनिया म्हणाल्या. दोषी लोकप्रतिनिधींची आमदारकी आणि खासदारकी अबाधित ठेवण्यासंबंधीचा केंद्र सरकारने जारी केलेला अध्यादेश हा ‘शुद्ध मूर्खपणा’ असून हा अध्यादेश फाडून फेकून दिला पाहिजे, अशी कठोर टीका राहुल गांधी यांनी केली होती. आमच्या सरकारने काढलेला हा अध्यादेश चुकीचा आहे, असे राहुल यांनी शुक्रवारी म्हटले होते. त्यावरून मोठे वादळ उठले आहे. या पार्श्वभूमीवर सोनिया गांधींनी ही स्तुतिसुमने उधळली आहेत.

आधी टीका, मग सारवासारव
पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हे सध्या अमेरिका दौºयावर आहेत. राहुल गांधी यांच्या टीकेमुळे उठलेल्या वादळानंतर सोनिया गांधी यांनी त्यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली होती. राहुल गांधी यांनीही त्यांना पत्र लिहून अवघड परिस्थितीत भक्कम नेतृत्व दिल्याबद्दल सिंग यांची स्तुती केली होती आणि त्यांच्याविषयी आदरही व्यक्त केला होता.

भेदाभेद ही अद्यापही गंभीर समस्या
समाजात जात, वर्ग आणि लिंगभेदावरून उपेक्षितांना अन्याय, भेदभावाला सामोरे जावे लागते. देशातील ही अजूनही गंभीर समस्या असून या प्रश्नातून मार्ग काढण्यासाठी धोरणे आणि कार्यक्रम आखण्याचे आवाहन सोनियांनी केले. गरीब व उपेक्षितांच्या कल्याणासाठी अजूनही बरेच करण्याची गरज असल्याचे त्या म्हणाल्या.