आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राममंदिर उभारणीसाठी बैठक यूपी सरकारच्या पत्राने वादंग, गृहसचिव मिश्र यांना डच्चू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ - केंद्र सरकारच्या संसदीय कायद्यानुसार सोमनाथच्या धर्तीवर अयोध्येत राम जन्मभूमीवर मंदिर उभारणीसंबंधी चर्चा करायची आहे, असे पत्र गृहसचिव सरेशचंद्र मिश्र यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांना लिहिल्याने उत्तर प्रदेशात खळबळ उडाली. त्यानंतर सायंकाळी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी मिश्र यांना पदावरून हटवले.
विशेष म्हणजे गृहमंत्रालय अखिलेश यादव यांच्या अखत्यारित असल्याने प्रचंड वादविवाद छेडला गेला आहे.हे पत्र मीडियाकडे गेल्यानंतर प्रधान सचिव (गृह) आर.एम.श्रीवास्तव यांनी तत्काळ पत्रकार परिषद बोलावून खुलासा केला व माफीही मागितली. त्याचबरोबर चुकीच्या छपाईमुळे हा गोंधळ झाला असून याप्रकरणी चौकशी सुरू आहे. दोषींविरोधात कारवाई करण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले.
बुधवारी, 9 तारखेला सरेश मिश्र यांनी हे पत्र लिहिले होते. पोलिस महासंचालक, अप्पर पोलिस महानिरीक्षक (कायदा-सुव्यवस्था)यांच्यासह वरिष्ठ अधिकार्‍यांची 14 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता बैठक बोलावली होती. विश्व हिंदू परिषदेच्या वतीने 18 ऑक्टोबर रोजी ‘संकल्प दिवस ’जाहीर करण्यात आला आहे.त्यानिमित्त सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती. परंतु पत्राच्या विषयाच्या जागी ‘सोमनाथच्या धर्तीवर रामजन्मभूमीवर भव्य राम मंदिर उभारणी करण्याबाबत चर्चा’असे लिहिले गेल्याने वादंग उठले. ही एक अनवधानाने झालेली चूक असून हा सरकारचा धोरणात्मक निर्णय समजू नये असे श्रीवास्तव यांनी सांगितले.
सेक्युलर सिंडिकेटचा डाव : लोकांची दिशाभूल करण्यासाठी गृहविभागाकडून जारी करण्यात आलेले हे पत्र सपा,बसपा आणि काँग्रेस या सेक्युलर सिंडिंकेटचा डाव आहे असा आरोप भाजप उपाध्यक्ष मुख्तार अब्बास नकवी यांनी केला आहे. दरम्यान, उत्तर प्रदेश सरकार अनेक जण चालवतात. काही महिन्यांपासून तर विहिंपही त्यात सहभागी झाल्यासारखे वाटते आहे. चूक एक अथवा दोन वेळा होते वारंवार होत नाही असे काँग्रेस नेते अखिलेशप्रताप सिंह म्हणाले.