लखनऊ - उत्तर प्रदेश न्यायिक मंडळातील ११ प्रशिक्षणार्थी न्यायाधीशांवर नोकरीतून बडतर्फीची कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. एकाच वेळी इतक्या संख्येने ज्युनियर न्यायाधीशांवर कारवाई केली जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. न्यायाधीशाचे तीन महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर सात सप्टेंबररोजी जवळपास दीड डझन ज्युनियर जज एका बार रेस्टॉरंटमध्ये सेलिब्रेशन करण्यासाठी गेले होते. तेथे दारू िपल्यानंतर ते
आपसांत भिडले. तेथे त्यांनी एकमेकांना मारहाण करत बारमध्ये मोठ्या प्रमाणात नासधूस व मोडतोड केली. अलाहाबाद उच्च न्यायालयाने या सर्व ज्यु. न्यायाधीशांना तूर्तास न्यायालयीन कामकाजातून मुक्त केले आहे. परंतु तपास समितीने त्या सर्वांना बडतर्फ करण्याची शिफारस केली आहे. या भांडणाची सुरुवात एका महिला ज्युनियरवरून सुरू झाली. सुरुवातीला चर्चा, वाद व नंतर भांडण अशा अंगाने हे प्रकरण वाढत गेले. मारहाणीत एक जज बेशुद्ध पडला. तर अनेकजण रक्तबंबाळ होऊन प्रशिक्षण केंद्रात पोहोचले. तेथे त्यांच्यात पुन्हा हाणामारी झाली.
उच्च न्यायालयाच्या प्रशासकीय समितीची बैठक झाली. त्यात हे प्रकरण अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या पूर्णपीठाकडे सोपवण्यात आले.
मुख्य न्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अकरा ज्युनियर जजना न्यायिक कार्यापासून मुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला.