आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्री रावत अडचणीत : उत्तराखंडमध्ये पेच; नऊ काँग्रेस आमदारांचे बंड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डेहराडून (उत्तराखंड) - उत्तराखंडमध्ये नऊ आमदारांनी केलेल्या बंडखोरीमुळे चार वर्षांपूर्वी सत्तेत आलेले काँग्रेस सरकार अडचणीत आले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री हरीश रावत यांनी अजूनही बहुमत आपल्या पाठीशी असल्याचा दावा केल्यानंतर राज्यपाल के. के. पाल यांनी त्यांना २८ मार्चपर्यंत विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यास सांगितले आहे. दुसरीकडे सभापती गोविंदसिंह कुंजवाल यांनी काँग्रेसच्या तक्रारीवरून बंडखोर आमदारांना पक्षांतरबंदी कायद्यानुसार नोटिसा बजावल्या आहेत.

हरकसिंह, अॅडव्होकेट जनरल उनियाल बडतर्फ
उत्तराखंडचे आरोग्य शिक्षणमंत्री व बंडखोर नेते हरकसिंह यांना बडतर्फ करण्यात यावे, अशी शिफारस मुख्यमंत्री हरीश रावत यांनी शनिवारी केली. राज्यपालांची भेट घेऊन रावत यांनी मंत्रिमंडळाच्या निर्णयाची माहिती दिली. हरकसिंह यांनी शुक्रवारीच पदाचा राजीनामा दिलेला आहे. दरम्यान, आणखी एक बंडखोर आमदार सुबोध उनियाल यांचे बंधू व उत्तराखंडचे अॅडव्होकेट जनरल यू. के. उनियाल यांनाही बडतर्फ करण्यात आले आहे. मुख्यमंत्री रावत यांनी सभागृहात बहुमत सिद्ध करू, असा दावा केला. दुसरीकडे बंडखोर नऊ आमदार विजय बहुगुणा व हरकसिंह रावत यांच्या नेतृत्वाखाली भाजप आमदारांसह दिल्लीत दाखल झाले आहेत.
हे आमदार भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेणार असून त्यानंतरच पुढील धोरण आखले जाणार आहे.
मोदी-शहा जोडीने तयार केली शॉपिंग लिस्ट..
या बंडखोरीचे खापर काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यावर फोडले. काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजयसिंह म्हणाले, मोदी-शहा जोडी जागोजाग असंतुष्ट आमदारांची शॉपिंग लिस्ट तयार करत आहे. काँग्रेस प्रवक्ते रणदीपसिंह सुरजेवाला म्हणाले, मोदी-शहा जोडी लोकनियुक्त सरकारे पाडण्याचे कारस्थान करून लोकशाहीची हत्या करत आहे.
यापूर्वी अरुणाचलमध्ये जे केले तेच आता उत्तराखंडमध्ये घडत असल्याचे ते म्हणाले.
भाजप सत्तालोलुप : केजरी
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी प्रतिक्रिया दिली. ट्विटरवर त्यांनी म्हटले आहे की, अगोदर अरुणाचलमध्ये आमदार खरेदीचे प्रकार झाले. आता उत्तराखंडमध्ये तेच घडत आहे. आपण सर्वात भ्रष्ट, देशद्रोही आणि सत्तालोलुप असल्याचे भाजपने सिद्ध केले आहे.
दोन्ही पक्षांचे दावे
काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षांनी बहुमत पाठीशी असल्याचे दावे केले आहेत. हरीश रावत सरकार अल्पमतात आल्याचे सांगून त्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपचे उत्तराखंड प्रभारी श्याम जाजू यांनी केली. दुसरीकडे मुख्यमंत्री रावत यांनी बंडखोरांपैकी पाच आमदार अजूनही काँग्रेसच्या संपर्कात असल्याचा दावा केला. या आमदारांनी चूक कबूल करावी, असे त्यांनी म्हटले आहे.
बातम्या आणखी आहेत...