आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महासंमेलनात वैश्य शक्तीचे दर्शन ; आर्थिक स्थिती, राजकीय सहभागावर विचारमंथन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर - दोनदिवसीय आंतरराष्‍ट्रीय वैश्य महासंमेलनाला येथे शनिवारी प्रारंभ झाला. वैश्य समाजाच्या समस्या, देशाची आर्थिक स्थिती व राजकीय सहभागावर पहिल्या दिवशी विचारमंथन झाले. देश-विदेशातील सुमारे 300 उद्योजक यात सहभागी झाले आहेत.


पहिल्या सत्रात उत्तराखंडमधील पीडितांसाठी पाच कोटी रुपयांचा निधी संकलित करण्यात आला. तत्पूर्वी महासंमेलनाचे संस्थापक अध्यक्ष रामदास अग्रवाल आणि वरिष्ठ कार्यकारी अध्यक्ष तसेच दैनिक भास्कर समूहाचे अध्यक्ष रमेशचंद्र अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटन झाले. माउंट एव्हरेस्टवर यशस्वी चढाई करणा-या प्रेमलता अग्रवाल, अपंग असूनही एव्हरेस्ट सर करणारी अरुणिमा सिन्हा, आयएएस अधिकारी किरण सोनी - गुप्ता व अभिनेता शैलेश लोढा यांचा रोख एक लाखांची रक्कम देऊन गौरव करण्यात आला.


तर क्षणात चित्र पालटेल - रामदास अग्रवाल : महासंमेलनात मार्गदर्शन करताना रामदास अग्रवाल यांनी राजकीय पक्षांना इशारा दिला. ते म्हणाले, ‘आमचे शोषण होत राहील आणि कुणीही यावर आवाज उठवणार नाही, असे समजू नका. टाळी एका हाताने वाजत नाही. काय द्यायचे आणि काय घ्यायचे हे तुम्हाला ठरवावे लागेल. परिस्थिती बदलली आहे. विचाराधारा बदलल्या आहेत. आता आपणही बदलले पाहिजे. जगाला हे दाखवून द्यावे लागेल की, आम्ही ठरवले तर क्षणात समोरचे चित्रही पालटेल.’ 6 जुलै हा दिवस आंतरराष्‍ट्रीय वैश्य महासंमेलनाचा स्थापना दिन म्हणून साजरा करावा, असे आवाहन त्यांनी केले.


महिलांना विशेष स्थान : रमेशचंद्र अग्रवाल
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, महासंमेलनाचे वरिष्ठ कार्यकारी अध्यक्ष आणि दैनिक भास्कर समूहाचे अध्यक्ष रमेशचंद्र अग्रवाल यांनी सांगितले, ‘महिलांना 50 टक्के आरक्षण देण्याची सध्या चर्चा सुरू आहे; परंतु वैश्य समाजात महिलांना आधीपासूनच सन्मान दिला जातो. संमेलनात सन्मान झालेल्या तीन महिला हे त्याचे उदाहरण आहे. आम्ही महिलांना 75 टक्के वाटा दिला आहे.’ कार्यक्रमास आंध्र प्रदेशचे सिंचनमंत्री टी.जी. व्यंकटेश, नेपाळचे माजी खासदार विनोद चौधरी, दैनिक नवज्योतीचे दीनबंधू चौधरी, मध्य प्रदेशचे गृहमंत्री उमाशंकर गुप्ता, आत्माराम गुप्ता यांची भाषणे झाली.


यांची उपस्थिती होती
संमेलनास अखिल भारतीय अग्रवाल संमेलनाचे अध्यक्ष सुरेंद्र गुप्ता, हाँगकाँगचे ज्वेलर्स अशोक मुंदडा, केंटचे सीएमडी महेश गुप्ता, माहेश्वरी समाजाचे अध्यक्ष रामपाल सोनी, खंडेलवाल महासभेचे अध्यक्ष रमेश बडाया, सरचिटणीस बाबूराम गुप्ता, कोशाध्यक्ष दामोदर मोदी, राजस्थान वैश्य महासंमेलनाचे अध्यक्ष गणेश राणा, खासदार विवेक गुप्ता, आदित्य बिर्ला समूहाचे सीईओ राजेश सोनी, राजीव बिंदल, महापौर ज्योती खंडेलवाल, पंजाबचे घनश्याम कंसल, ज्ञानचंद गुप्ता, हरियाणाचे अशोक बुवानीवाला, बिहारचे जगन्नाथ प्रसाद गुप्ता, राजेश अग्रवाल, माजी आमदार रविकांत गर्ग, ओडिशाचे किशन भरतिया, महाराष्‍ट्राचे मोहनलाल गुप्ता, उत्तरांचलचे सोहनलाल गुप्ता, दिल्लीचे सुनील गर्ग, आंध्र प्रदेशचे राजामौली गुप्ता, छत्तीसगडचे संतोष अग्रवाल, मुंबईचे गोपीनाथ साबू, सरचिटणीस ध्रुवदास अग्रवाल, रामेश्वर खंडेलवाल, अरुण गुप्ता, अरुण अग्रवाल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.