आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Vandana Dhaneshwar Story About UNICEF Deepshikha Campaign

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जे जे आपणांसी ठावे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज शिक्षणाचा दर्जा ई-लर्निंग, डिजिटल क्लासरूममुळे सुधारलाय. टक्केवारीही वाढलीय.
मात्र केवळ शहरी भागात. शाळेत पोहोचण्यासाठी करावी लागणारी अनेक मैलांची पायपीट, दळणवळणाच्या व शैक्षणिक साधनांचा अभाव, शाळागळतीच्या प्रमाणातली वाढ हे चित्र ग्रामीण भागात आजही कायम आहे.
मात्र अशाही परिस्थितीत स्वत: शिक्षण घेऊन इतरांना शिकवणाऱ्या, त्यांना शाळेपर्यंत नेण्यासाठी धडपडणाऱ्या शिक्षणाच्या शिलेदारांची ही गोष्ट. आजच्या शिक्षक दिनानिमित्त...जे जे आपणांसी ठावे,
ते ते इतरांसी सांगावे शहाणे करोनी सोडावे,
सकल जन


आपल्याला असलेलं ज्ञान, आपलं शिक्षण समाजाच्या उपयोगी पडावं हे सांगणाऱ्या समर्थ रामदासांच्या श्लोकामधल्या या ओळी. चार भिंतींमध्ये शिकवली जाणारी छापील कागदावरची अक्षरं गिरवणं एवढाच शिक्षणाचा अर्थ नाही. पुस्तकाच्या चौकटीपलीकडच्या जगाचं भान, वास्तवाची जाणीव, प्रतिकूलतेतून आलेली उमज आणि त्यातून समाजासाठी काही करण्याची तळमळ या सर्वांचा मिलाफ म्हणजे शिक्षण. समर्थ रामदासांच्या या समाजव्यापी विचाराला वास्तवात आणण्यासाठी धडपड करत आहेत, जालन्याच्या जाफराबाद तालुक्यातील काही मुलंमुली. युनिसेफच्या दीपशिखा प्रकल्पाच्या माध्यमातून. त्यांनी आसपासच्या खेड्यातल्या मुलामुलींना अक्षरजगाची ओळख करून दिली आहे.

साथ दीपशिखाची
खूप शिकून सीईओ होण्याची जिद्द ठेवणारी बदनापूरची सुनीता उबाळे, कबड्डी-खोखो हे खेळ खेळणारी सावरखेड्याची सीमा गोफणे, भराडखेड्याची हजरजबाबी वनिता मापारी, नर्स होऊन रुग्णसेवेची इच्छा असणारी देऊळझरीची जयश्री भिसे, या जाफराबादसारख्या मागास तालुक्यातल्या आपल्यासारख्याच सामान्य मुली. मात्र याच मुलींनी धीटपणा दाखवत स्वत:चा बालविवाह थांबवला. शिक्षण पूर्ण करण्याचा निर्धार केला. त्यांच्यात ही हिंमत निर्माण केलीय ती युनिसेफच्या दीपशिखा प्रकल्पानं. ग्रामीण भागातील विविध समस्यांचा अभ्यास करून त्यांच्या निवारणासाठी युनिसेफ, निमशासकीय संस्थांच्या मदतीने काम करते. दीपशिखा हा त्याचाच एक भाग. किशोरवयीन मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणणं, त्यांच्यात आरोग्यजागृती करणं, मुलींच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी पूरक उपक्रम राबवणं हा दीपशिखाचा मुख्य उद्देश. या उपक्रमाअंतर्गत मुलींचं समुपदेशन व त्यांना मार्गदर्शन केलं जातं. त्यांचे स्वयंसहायता गट तयार केले जातात. सीमा, वनिता, जयश्रीसुद्धा याच गटाचा एक भाग आहेत. दीपशिखाच्या माध्यमातून बालविवाहाच्या दुष्परिणामांबाबत या मैत्रिणींने जाणून घेतलं. स्वत:च्या पालकांनाही ते पटवून देत स्वत:चा विवाह नाकारण्याचं धाडस दाखवलं. इतकंच नव्हे तर या मैत्रिणींने आपल्यासारख्याच समवयस्क मुलींचे बालवविाह थांबवून त्यांना शिकण्यासाठी उद्युक्त केलं आहे.

शाळेसाठी बस - बससाठी आंदोलन
ग्रामीण भागातील मुलींचं साक्षरतेचं प्रमाण वाढावं, त्यांची शाळा उपस्थिती वाढावी या हेतूनं राज्य शासनाच्या मानवविकास कार्यक्रमांतर्गत जून २०१२ पासून मुलींसाठी मोफत बस सुविधा सुरू करण्यात आली. राज्यातल्या १२५ तालुक्यांमध्ये प्रत्येकी पाच बसची तरतूद याअंतर्गत करण्यात आली. शिवाय आता प्रत्येकी अतिरिक्त दोन बसेसही उपलब्ध करून देण्याचा प्रस्तावही मंजूर करण्यात आला आहे. मात्र जाफराबादमधल्या तालुक्यांमध्ये, खेडेगावांमध्ये पक्के रस्ते नसल्याने बस येत नव्हती. गावातला कच्चा रस्ताही पावसाळ्यात दिसेनासा झाल्याने गावांचा संपर्क तुटतो.

परिणामी मुली शाळेपर्यंत पोहोचू शकत नाहीत. शिवाय इतर दविसांमध्येही पाच िकलोमीटरवर असलेल्या शाळेत मुलींना पाठवायचे म्हणजे पालकांसमोर सुरक्षिततेचा प्रश्न असतो. अशा विविध कारणांमुळे हळूहळू मुलींचं शाळेत जाणं, शिकणं बंद होतं. आणि मुलींचं शिक्षण बंद झालं की पालक त्यांचं लग्न लावतात हाच या जवळपास सर्वच तालुक्यांमधला प्रघात आहे. म्हणजेच बालवविाह आणि त्या अनुषंगाने भेडसावणाऱ्या सर्व समस्यांच्या मुळाशी मुलींचं शिक्षण थांबणं हेच एकमेव कारण असतं. या सर्वांचा अभ्यास करून त्यावर उपाय शोधण्यासाठी वनिता, भाग्येश्वर, सीमा, जयश्री, सर्जेराव यांनी वर्षभरापूर्वी ग्रामपंचायतीत ठराव मांडून रास्ता रोको आंदोलन केलं. आता जाफराबाद तालुक्यामधल्या अनेक खेडेगावांमधील मुलींना शाळेसाठी बस उपलब्ध झाली आहे. सीमा, वनिता आणि जयश्री यांच्या बरोबरीनं, भाग्येश्वर वायाळ, सर्जेराव भोपळे, अिनल सहाने या आणि यासारख्या असंख्य मुलामुलींची टीम सिपोरा, ब्रह्मपुरी, देऊळझरी, सावरखेडा, हनुमंतखेडा, गोंदणखेडा, निखेडा, कुंभारी, खाजगाव, वीरखेडा भालके, खानापूर, सावरगाव म्हस्के या तालुक्यांमध्ये जाऊन मुलींनी शिकावं यासाठी प्रयत्न करत आहेत. मुख्य म्हणजे आपले हे मित्रमैत्रिणी केवळ शिक्षणाचं महत्त्व सांगून थांबलेले नाहीत. शिक्षण अर्धवट सोडल्याने िनर्माण होणाऱ्या बालविवाहासारख्या समस्या, त्याचे वैयक्तिक, सामाजिक , शारिरीक दुष्परिणाम याबाबतही ही टीम या खेड्यांमधून लोकशिक्षणाचं काम करते आहे. वास्तविक, शेतावर मजुरी करणाऱ्या, शिक्षण-आधुनिकीकरणाचा गंध नसणाऱ्या, आर्थिक हलाखीचा वारसा लाभलेल्या जाफराबादसारख्या मागास भागात हे काम करणं सोपं नव्हतं. पारंपरिक समजुतींना जोपासणाऱ्या लोकांचे विचार बदलणं, त्यांना शिक्षणाचं महत्त्व पटवून देणं हे या मार्गातलं मोठ्ठं आव्हान होतं. मात्र संपर्काची, दळणवळणाची विशेष साधनं उपलब्ध नसताना केवळ समाजात सकारात्मक बदल घडावण्याच्या एकमेव उद्देशानं मुलामुलींचा हा चमू सक्रिय आहे.

शिक्षण-ज्ञान-माहितीमुळे आपल्या आयुष्यात जसे चांगले बदल झाले तसेच ते आपल्या आसपासच्या लोकांपर्यंत पोहोचावेत, त्यांच्याही स्वप्नांना उमेदीचे पंख मिळावेत यासाठी अथक प्रयत्न करणारे हे शिक्षणाचे शिलेदार. मनात आणलं असतं तर स्वत:पुरता बदल घडल्यानंतर ते थांबूही शकले असते. मात्र आपल्यापर्यंत आलेला शिक्षणाचा प्रवाह त्यांनी वाहता ठेवला हेच त्यांचं वेगळेपण. आणि त्यांना असा विचार करायला शिकवणाऱ्या शिक्षणाचं यशही...

vandana.d@dbcorp.in