आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वरुण गांधी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री व्हावे; मातोश्री मनेका गांधींची इच्छा!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पिलीभीत - उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीला अजून तीन वर्षे बाकी असली तरी मनेका गांधी यांनी मुलगा वरुण यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी पुढे केले आहे. ‘सध्या राज्यातील जनता त्रस्त आहे, पण जर राज्यात भाजप सरकार असते तर चांगले झाले असते. आम्ही हक्काच्या माध्यमातून सरकार चालवले असते. वरुण यांच्याकडे राज्याची धुरा असती तर आणखी मजा आली असती. तसे झाले असते तर पिलीभीतची चांदीच चांदी झाली असती, पण ही तर नंतरची गोष्ट आहे,’ असे मनेकांनी म्हटले आहे. भाजपने मात्र हे मनेका गांधी यांचे वैयक्तिक मत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

मनेका गांधी रविवारी पिलीभीतमध्ये होत्या. त्यांनी आधी राज्यातील सपा सरकारच्या कमतरतांचा आढावा घेतला. त्या म्हणाल्या की, या वेळी लोकसभा निवडणुकीत भाजपने 73 जागा जिंकल्या आहेत, पण राज्यात आमचे सरकार नसल्याने लोक त्रस्त आहेत. जेव्हा केंद्राप्रमाणेच राज्यातही भाजप सरकार येईल तेव्हाच राज्याचा विकास होईल. मनेकांच्या या वक्तव्यानंतर उपस्थितांनी ‘हमारा सीएम कैसा हो, वरुण गांधी जैसा हो’ अशा घोषणा दिल्या.

वीज, पाण्याची समस्या
नागरिकांना राज्यात वीज, पाणी आणि पायाभूत सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे लोकांनी येत्या विधानसभा निवडणुकीत सपाला धडा शिकवावा, असे आवाहन मनेका यांनी केले. मोदी यांनी आपल्या मंत्रिमंडळात नेत्यांच्या मुलांना थारा दिला नाही. केंद्रीय मंत्रिमंडळात आपल्या मुलाचा समावेश व्हावा यासाठी राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे यांची प्रयत्न केले होते. त्यामुळे मनेका यांच्या इच्छेला किती महत्त्व दिले जाईल ते लवकरच समजेल.

सध्या बोलणे घाईचे होईल
सध्या मुख्यमंत्रिपदाबाबत बोलणे घाईचे ठरेल. हे मनेकांचे वैयक्तिक मत आहे, पक्षाचे नाही. मुख्यमंत्री म्हणून कोणाला प्रोजेक्ट करायचे याबाबतचा कोणताही निर्णय केंद्रीय नेतृत्वच घेईल. - लक्ष्मीकांत वाजपेयी, भाजप प्रदेशाध्यक्ष, यूपी.