अलिगढ - मुलींकडे मुले आकर्षित होऊ शकतात आणि ग्रंथालयातील मुलांची गर्दी चारपटीने वाढेल, असा वादग्रस्त युक्तिवाद करत अलिगड विद्यापीठात विद्यार्थिनींना ग्रंथालयात प्रवेशबंदी घालण्यात आली आहे. तथापि, यामागे तसे कारण नसून ग्रंथालयात बसण्यासाठी जागा पुरत नसल्याने हा निर्णय घेण्यात आल्याची सारवासारव नंतर करण्यात आली आहे.
विद्यापीठाचे मौलाना आझाद हे भव्य ग्रंथालय असून या ठिकाणी हजारो विद्यार्थ्यांना अभ्यास करता येण्याची सुविधा आहे. विद्यापीठाच्या महिला महाविद्यालयातील मुलींना या ग्रंथालयाचे सदस्यत्व दिले जात नाही. मुलींना १९६० पासूनच ग्रंथालयात प्रवेश नसल्याचे कुलगुरू जमीरुद्दीन शहा यांनी म्हटले आहे.
पदव्युत्तर वर्गाच्या मुलींना प्रवेश आहे. त्यामुळे भेदभाव करण्यात येत असल्याचा आरोप चुकीचा आणि बदनामी करणारा असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. ग्रंथालयात पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध झाल्यानंतरच या मुलींना प्रवेश देण्याबाबत निर्णय घेता येऊ शकेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महिला महाविद्यालयातील ग्रंथालयापेक्षा या मौलाना आझाद ग्रंथालयातील ग्रंथसंख्या मोठी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी प्रवेश देण्याची विद्यार्थिनींची मागणी आहे. दरम्यान, विद्यापीठ प्रशासनाच्या या निर्णयाचा महिला संघटनांकडून विरोध होत आहे.