आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कर्जामध्ये बुडालेली चार गावे लिलावासाठी तयार, ९९% लोक कर्जबाजारी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाजिल्का (पंजाब) - भारत-पाक सीमेजवळील चार गावे आपला लिलाव करून घेण्यास तयार आहेत. या गावांमध्ये प्रवेश करताच काही पोस्टर्स दिसतात. एखाद्या श्रीमंत व्यक्तीने, टाटा, अंबानी किंवा सरकारने आमच्यासाठी बोली लावावी, असे या पोस्टर्सवर लिहिले आहे. गावच्या गाव विक्रीसाठी तयार असल्याचे यात लिहिले असून शेतकरी हतबल झाल्याचा संदेश दिला आहे.
फाजिल्काच्या केरियां, मुठिया वाली, चानन वाला, चुल्हडी वाला या गावांतील ९९% लोक कर्जाच्या आेझ्याखाली आहेत. जमीन नापीक होत आहे. अडीच महिन्यांपासून कालव्यांना पाणी नाही. पिकांचे नुकसान झाले आहे. कर्ज फेडण्याएेवजी ते वाढतच आहे. सीमेजवळ असल्याने सुविधा मिळत नसल्याचे येथील शेतकरी दविंदर सावनसुखा, महावीर यांचे म्हणणे आहे. अनेक सरकारे आली, मात्र समस्या जैसे थे आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी गावच विकायला काढले आहे. आम्ही कुटुंबाचे पालनपोषण कसे करावे, असा सवाल त्यांनी विचारला आहे.

पाकिस्तानच्या सीमेजवळ गाव असल्याने सीमेपलीकडून येणाऱ्या गोळ्या व बॉम्ब झेलणे रोजचीच बाब आहे. अकाली नेता गावात आल्यास तो म्हणतो, हे गाव काँग्रेसींचे आहे, तर काँग्रेसचा नेता म्हणतो की, येथे अकालींना अधिक समर्थन आहे. दोन्ही राजकीय पक्ष जबाबदारी झटकून देतात. सरकारी अधिकारी गावातील समस्या पाहून हबकून जातो. या गावात येण्याचीही अधिकाऱ्यांना भीती वाटते. या गावात कोणीही विवाह प्रस्ताव देत नसल्याने अनेक अविवाहित तरुण असल्याचे धर्मपाल, अमर सिंह या गावकऱ्यांनी सांगितले. वीजपुरवठाही जेमतेम होतो. सरकारी शाळांमध्ये शिकवले जात नाही. माध्यमिक शिक्षणाची सोयच नाही. गावात रुग्णालय नाही.

पंजाब आणि केंद्र सरकारकडून कोणतीच मदत मिळत नसल्याचे शेतकरी धर्मपाल, अश्वनी कुमार यांनी सांगितले. ही गावे पंजाब, राजस्थान आणि हरियाणापैकी कोणत्याही राज्यात नोंदीकृत नाहीत. संबंधित विभागाकडे ते कालव्यांतील पाण्याचा प्रश्न घेऊन जातात. सत्ताधारी सरकारमधील लोक आपल्या शेतांकडे कालव्याचे पाणी वळवतात. आम्ही काहीच करू शकत नाही, असे उत्तर त्यांना मिळते. फाजिल्काचे अतिरिक्त जिल्हाधिकारी चरणदेव सिंह मान यांनी सर्व कालव्यांत पाणी सोडल्याचे सांगितले. काही कालव्यांतील पाणी कमी झाले होते, आता तिकडेही पुरवठा सुरू होईल, असे मान म्हणाले. गाव विक्रीस काढल्यासंबंधी आपण अनभिज्ञ असल्याचे ते म्हणतात. पंजाबचे आरोग्यमंत्री आणि फाजिल्काचे आमदार सुरजित जियाणी म्हणतात की, विरोधकांचे हे कारस्थान आहे.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...