जम्मू - जम्मू-काश्मीरच्या सांबा जिल्ह्यामध्ये एका कालव्याच्या कडेला गायीचा शीर कापलेला मृतदेह आढळल्यानंतर परिसरात तणाव पसरला. या प्रकारामुळे नाराज झालेल्या नागरिकांनी रस्त्यावर उतरून हिंसक आंदोलन केले. लोकांनी दगडफेक आणि जाळपोळ केली. नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज, अश्रूधुराच्या नळकांड्या आणि हवेत फायरिंग करावे लागले. यामध्ये कोणत्याही जिवीत हानीचे वृत्त नाही. घटनेनंतर परिसरामध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच स्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी लष्कराला पाचारण करण्यात आले आहे. सांबा ते जम्मूच्या मार्गावरील दोन्ही बाजुची वाहतूकही थांबवण्यात आली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांची गाडी जाळली
काही प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी राया परिसरात रस्त्याच्या कडेला एक शीर कापलेली गाय आढळून आली. त्यानंतर स्थानिकांनी आंदोलन आणि घोषणाबाजी करत जम्मू-कठुवा नॅशनल हायवेवरील वाहतूक रोखली. संतप्त आंदोलकांनी घटनास्थळी आलेल्या पोलिसांवरही दगडफेक केली. तसेच हायवेवर उभ्या असलेल्या ट्रक आणि इतर गाड्यांची तोडफोड आणि जाळपोळही केली. विजयपूरजवळ हायवेवर सांबाच्या जिल्हाधिकारी शीतल नंदा यांच्या गाडीलाही आग लावण्यात आली.
बुधवारीही झाला वाद
बारी ब्राह्मणा परिसरात एका स्थानिक कारखान्यात काही धार्मिक पुस्तके जाळल्यानंतर बुधवारी काही लोकांनी नॅशनल हाईवेवर वाहतूक रोखली होती. जम्मूचे विभागीय आयुक्त पवन कोटवाल यांनी दोन्ही घटनांना दुजोरा दिला आहे. तसेच या घटनांचा परस्परांशी संबंध असल्याचेही म्हटेल आहे. या प्रकारांमध्ये काही देशविरोधी तत्वांचा सहभाग असून त्यांना परिसरातील शांतता भंग करायची असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, या हिंसक आंदोलनाचे फोटो...
फोटो - अंकुर सेठी