आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Vishwa Hindu Parishad 80 Kilometer Parikrama Yatra For The 80 Seats Of UP

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उत्तर प्रदेशातील 80 जागांसाठी विश्‍व हिंदू परिषदेची 80 कोस परिक्रमा यात्रा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ/अयोध्या - केवळ धार्मिकच नव्हे, राजकीयदृष्ट्याही उत्तर प्रदेश सर्वांत मोठा आखाडा बनला आहे. राज्यात लोकसभेच्या तब्बल 80 जागा. मग या आखाड्यात शेवटी रामलल्लाचा प्रश्न येतो. 84 च काय, 184 कोस यात्रा करावी लागली तरी बेहत्तर, अशी विहिंपची ईर्षा. समाजवादी पार्टीही यात्रेचा हा प्रयत्न हाणून पाडण्यास सज्ज आहे. धर्मनिरपेक्षतेचा जप करत मुस्लिम मते टिकवून ठेवणे ही सपाची गरज आहे. रविवारी नेमके तेच झाले. विहिंपची 84 कोस परिक्रमा यात्रा सपाने अवघ्या 100 पावलांतच रोखली. दोन दिवसांपासून प्रवीण तोगडिया अयोध्येत होते; परंतु सरकार शांत राहिले. परिक्रमेचे वातावरण तापल्यावरच त्यांना रविवारी अटक करण्यात आली. उद्देश एकच, ‘विजय असो... तुमचा आणि आमचाही!’ संपूर्ण उत्तर प्रदेशला छावणीचे रूप आले. सकाळी 6 वाजता सुरू झालेले अटकसत्र रात्री 9 पर्यंत सुरू होते. 2100 लोकांना अटक केल्याचा पोलिसांचा दावा आहे.


महंत रामविलास वेदांता यांना प्रथम अटक झाली. शरयू नदीच्या तिरावर ते पूजेसाठी जात होते. पाठोपाठ रामजानकी मठाचे महंत राघवदास, नंतर महंत नृत्यगोपाल यांना अटक झाली. राज्य सरकारला मात्र अशोक सिंघल आणि प्रवीण तोगडिया हवे होते. अयोध्येत परिक्रमेला प्रारंभ करण्यापूर्वी तोगडियांना तर सिंघल यांना लखनऊ विमानतळावर अटक करण्यात आली. संतांच्या अपमानाचा हिंदू बदला घेईल, असा इशारा सिंघल यांनी दिला. सोमवारी देश निदर्शने करण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.


हे फिक्सिंग आहे?
काँग्रेस, सपा, भाजपचे परस्परांवर आरोप
- अयोध्येतील मॅच फिक्स आहे. सपा-भाजपमध्ये फिक्सिंग झाली आहे. : दिग्विजयसिंह, काँग्रेस
1990 पासूनच सपा-भाजपची हातमिळवणी आहे. मतांच्या धु्रवीकरणासाठी हे नाटक रचले आहे. : बेनीप्रसाद वर्मा, केंद्रीय मंत्री
बड्या साधू-संतांना अटक झाली आहे. ही काय फिक्सिंग वाटते? उत्तर प्रदेशातील मुगलिया राजवट आणि सोनियांना देवाचे शाप लागतील. : अशोक सिंघल, विहिंप नेते
काँग्रेसला मॅच फिक्सिंगचा मोठा अनुभव आहे. फिक्सिंगसाठीच त्यांच्या पंतप्रधानांनी 1992 मध्ये बाबरी मशिद पाडू दिली होती. : आजम खान, समाजवादी पार्टी
मुस्लिम ताजिया काढतात तसे हिंदू यात्रा काढतात. दिग्विजय यांची ‘साठी बुद्धी नाठी’ झाली आहे. : कीर्ती आझाद, भाजप
आमची नव्हे, मतांच्या राजकारणासाठी ही तर सपा आणि केंद्र सरकारची फिक्सिंग आहे. : उमा भारती, भाजप.