आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Assembly Elections: Voting Of Fourth Phase In Jhakrhand And Jammu Kashmir

चौथ्या टप्प्यातही झारखंड जम्मू-काश्मीरमध्ये मतदारांचा उत्साह कायम, पाहा PHOTO

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रांची - जम्मू काश्मीरमधील 18 तर झारखंडमधील 15 विधानसभा जागांचा फैसला मतदानयंत्रांमध्ये बंद झाला आहे. सकाळी सात वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली होती. दुपारी तीनपर्यंत जम्मू काश्मीरमध्ये 37.5 टक्के तर झारखंडमध्ये 5 वाजेपर्यंत 60 टक्के मतदानाची नोंद झाली.
सकाळच्या सत्रात झारखंडमध्ये थंडीतही चांगला प्रतिसाद मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले. तर जम्मू काश्मीरमध्येही नागरिकांनी कोणत्याही धमकीला भीक न घालता मतदानासाठी सकाळपासून मतदान केंद्रांवर गर्दी केल्याचे चित्र होते.
झारखंडमध्ये चौथ्या टप्प्यात 15 जागांसाठी मतदान होत आहे. थंडीमुळे सुरुवातीला मतदान केंद्रांवर शांतता दिसून आली. मात्र, काही वेळाने लोकांनी बाहेर पडून मतदान करणे पसंत केल्याने मतदान केंद्रांबाहेर सध्या मोठ्या रांगा दिसून येत आहेत. धनबाद आणि बोकारो मध्ये सायंकाळी पाच वाजेपर्यंत आणि इतर मतदारसंघात दुपारी तीनपर्यंत मतदान झाले.
झारखंडमध्ये 16 महिलांसह 217 उमेदवारांचे भाग्य पणाला लागले आहे. सुरक्षेची कडक व्यवस्था असून अनेक माओवादी भागातही पहिल्या तीन टप्प्यात मतदान शांततेत पूर्ण झाल्याचे चित्र आहे. एकट्या झारखंडमध्ये 40 हजार सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत. त्यात निमलष्करी दल, झारखंड जगवार, जॅप, इंडियन रिझर्व बटालियन आणि जिल्हा पोलिसांचा समावेश आहे. तीन हेलिकॉप्टरचा समावेशही करण्यात आला. बिहार आणि पश्चिम बंगालला लागून असलेली सीमाही सील करण्यात आली होती. गिरिडीह जिल्ह्याच्या दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागांत 52 बूथवर 104 पोलिंग पार्टी हेलिकॉप्टरच्या मदतीने पोहोचवण्यात आल्या.

यांची प्रतिष्ठा पणाला
झाविमो प्रमुख बाबुलाल मरांडी, पर्यटन मंत्री सुरेश पासवान, पशुपालन मंत्री मन्नान मल्लिक, मंत्री हाजी हुसैन अंसारी, जगन्नाथ महतो, मथुरा महतो, उमाकांत रजक, निर्भय शाहाबादी, विनोद कुमार सिंह, चंद्रिका महथा, सरफराज अहमद आणि अरूप चॅटर्जी.

सर्वाधिक 28 उमेदवार - बोकारो विधानसभा मतदारसंघ
सर्वात कमी 10 उमेदवार - चंदनक्यारी, जमुआ व टुंडी मतदारसंघ
सर्वात मोठा विधानसभा मतदारसंघ (मतदात्यांच्या संख्येवरून)- बोकारो
सर्वात छोटा विधानसभा मतदारसंघ (मतदात्यांच्या संख्येवरून)- चंदनक्यारी


जम्मू-काश्मीरमध्ये 182 उमेदवारांची परीक्षा
जम्मू काश्मीरमध्ये मतदानाच्या पहिल्या दोन टप्प्यांमध्ये विक्रमी मतदान झाल्यामुळे हा टप्पाही अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. सत्ताधारी नॅशनल कॉन्फरन्स आणि विरोधी पीडीपी यांच्या मुख्य लढत रंगणार आहे. नॅशनल कॉन्फरन्ससाठी श्रीनगरच्या आठ जागांवर महत्त्वाची लढत आहे. तर पीडीपीसमोर दक्षिण काश्मीरचा किल्ला टिकवण्याचे आव्हान आहे.
या टप्प्यात श्रीनगर, अनंतनाग, शोपियां आणि सांबाच्या 18 मतदारसंघांसाठी मतदान होत आहे. यात सर्वात महत्त्वाच्या श्रीनगरच्या आठ जागा आहेत. येथे प्रवाहातील राजकीय पक्षांबरोबरच फुटीरतावाद्यांसाठीही करा किंवा मरा अशी स्थिती आहे.
मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला सोनवर मतदारसंघामधून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्यासह 182 उमेदवारांची प्रतिष्ठा या टप्प्यात पणाला लागलेली आहे. जम्मू काश्मीरमध्ये 20 डिसेंबरला अखेरच्या टप्प्यातील मतदान होणार असून, 23 डिसेंबरला निकाल घोषित होणार आहेत.