आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकने एक गोळी झाडली तर प्रत्युत्तरात गोळ्यांचा वर्षाव; गृहमंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नौशहरा बॉर्डर- सीमेवरील गोळीबार थांबवण्यास पाकिस्तानला बाध्य करण्यासाठी भारत उपाययोजना करत आहे. त्यामुळे काही वेळ वाट पाहा, पाकिस्तान आपोआप गोळीबार थांबवेल, अशा शब्दांत गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी जम्मू काश्मीराच्या सीमावर्ती भागातील लोकांना दिलासा दिला. तर, पाकिस्तानने एक गोळी झाडली तर भारताकडून गोळ्यांचा वर्षाव होईल, असा सज्जड दमही त्यांनी पाकिस्तानला भरला. 


चार दिवसांच्या काश्मीर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री सीमावर्ती भागात पोहोचले. पाकिस्तानकडून होत असलेल्या गोळीबाराला त्रासून चार महिन्यांपूर्वी पलायन करून आलेल्या नागरिकांची त्यांनी भेट घेतली. या नागरिकांना संबोधत ते म्हणाले, पहिली गोळी आपल्याकडून झाडली जाणार नाही, असे आम्ही बीएसएफला बजावले आहे. ते आमचे शेजारी आहेत, पण त्यांनी एक गोळी झाडली की आपल्याकडून न मोजता गोळ्या झाडल्या जायला हव्यात. काश्मिरातील एखाद्या युवकाने अनवधानाने एखादी चूक केली असल्यास त्याला गुन्हेगारासारखी वागणूक न देता किशोरवयीन गुन्हेगारी कायद्यानुसार कारवाई करावी, असा सल्ला त्यांनी सुरक्षा यंत्रणेला दिला आहे.    

काश्मीर मुद्द्यावर ‘फाइव्ह-सी’ हा कायमस्वरूपी उपाय
गृहमंंत्री पुढे म्हणाले, काश्मिरातील विविध शिष्टमंडळांच्या भेटीगाठी आणि बैठकांनंतर मी सांगू शकतो की, काश्मिरातील परिस्थितीत आमूलाग्र सुधारणा झाली आहे. याचा अर्थ सर्वकाही आलबेल आहे असा माझा दावा नाही; पण परिस्थितीत बराच बदल झाला आहे. काश्मिरातील समस्येबाबतच्या जुन्या वादग्रस्त मुद्द्यांच्या समाधानासाठी आपण कोणत्याही व्यक्तीला भेटण्यास तयार आहोत. येथील मुद्द्यावर कम्पॅशन (सहानुभूती), कम्युनिकेशन (संवाद), कोएक्झिस्टन्स (सहअस्तित्व), कॉन्फिडन्स बिल्डिंग (आत्मविश्वास बहाली) व कन्सिस्टन्सी (सातत्य) या ‘फाइव्ह-सी’च्या माध्यमातून कायमस्वरूपी तोडगा निघू शकतो, असेही राजनाथ सिंह यांनी या वेळी म्हटले.

५५ शिष्टमंडळांशी केली चर्चा  
सिंह म्हणाले, मी या दौऱ्यात काश्मीर खोऱ्यातील विविध ५५ शिष्टमंडळांच्या भेटी घेतल्या. वास्तविक, यासाठी कुणालाच औपचारिक निमंत्रण देण्यात आले नव्हते. मी नेहमीच खुल्या मनाने या ठिकाणी येतो. सरकारनेही चर्चेसाठी तयार असलेल्या प्रत्येक घटकाच्या भेटीगाठी घ्यायला हव्यात. 

सर्वच घटकांशी चर्चेस तयार  
काश्मिरातील समस्या सोडवण्यासाठी आमची मदत करण्यास इच्छुक असलेल्या प्रत्येक व्यक्तीशी भेटण्यास मी तयार आहे. यासाठी औपचारिक निमंत्रण देण्याची गरज नाही. ज्यांना चर्चा करायची आहे त्यांनी थेट पुढाकार घ्यावा. फुटीरतावाद्यांच्या वारंवार अटकेची कारवाई राज्य सरकार करते, त्यात आमचा हस्तक्षेप नाही, असे त्यांनी म्हटले. 

पॅलेट गनचा वापर कमी झाला  
काश्मिरात आंदाेलकांविरोधात पॅलेट गनचा वापर कमी झाला आहे, असे सिंह म्हणाले. नागरिकांवर गरजेपेक्षा अधिक बलप्रयोग करू नये असे आदेश सुरक्षा दलांना दिल्याचेही त्यांनी सांगितले. अापण विश्वास व विश्वसनीयता कायम ठेवण्यासाठी यथाशक्ती प्रयत्न करू. कारण नेत्यांच्या कथनी व करणीत फरक असल्याने भारतातील राजकारणावर विश्वसनीयतेचे मोठे संकट आहे, असेही त्यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...