बस्ती (उ.प्र.) - सिडनी येथे तयार झालेल्या पाण्यावर चालणा-या बसचा पहिला प्रयोग पुढील दोन महिन्यांत मुंबईत केला जाईल, अशी माहिती केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी उत्तर प्रदेशातील एका कार्यक्रमात दिली. एका रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमानिमित्त जमलेल्या पत्रकारांशी ते चर्चा करत होते. रस्ते आणि रेल्वे भाड्यापेक्षा जलमार्गाचा प्रवास स्वस्त असल्याने जलमार्गांचा अधिकाधिक विकास हे एनडीए सरकारचे मुख्य उद्दिष्ट असेल, असे गडकरी म्हणाले. रेल्वे आणि रस्त्यांच्या तुलनेत जलमार्गाचे भाडे एकचतुर्थांश आहे. त्यामुळे मुंबईत पाण्यावरील बसचा प्रयोग केला जाणार आहे. पाण्यावर चालणा-या विमानावरही आमचे लक्ष असल्याचे गडकरी म्हणाले. देशात पाच जलमार्ग कार्यान्वित असून देशभरात आणखी १०१ जलमार्गांच्या विकासाची योजना असल्याचे गडकरी म्हणाले. यापैकी एक प्रकल्प शरयू नदीवर असेल. बनारस ते कोलकात्यातील हल्दियादरम्यान १२ टर्मिनल्सच्या विकासाचा प्रकल्प दोन महिन्यांत सुरू होईल. जगात नैसर्गिक साखर वापरण्याकडे कल असल्यामुळे साखर कारखान्यांची स्थिती दयनीय झाली.