आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाटणा शहर उडेल इतका शस्त्रसाठा जप्त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा - बिहारचे पोलिस शुक्रवारी सकाळी जेव्हा रामकृष्णानगरमध्ये एका लॉजवर पाेहोचले तेव्हा संपूर्ण पाटणा शहर उडवता येऊ शकेल इतका प्रचंड शस्त्रसाठा पाहून त्यांचे डोळेच विस्फारले. बिहारमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. पोलिसांनी घेतलेल्या झडतीत ७२ डिटोनेटर्स , ५२ टायमर, ७ रिमोट कंट्रोल, ५ किलो अमोनियम नायट्रेटसह मोठ्या प्रमाणात साउंड सेन्सर, लाइट सेन्सर व ६ युनिक सेन्सर सापडले. हा सगळा साठा नक्षलवाद्यांचा होता.

एसएसपी विकास वैभव यांनी सांगितले की आम्ही गृहमंत्रालयाच्या उत्तराची प्रतीक्षा करत आहोत. सूत्रांनी िदलेल्या माहितीनुसार एका बॉम्बचा स्फोट झाल्यास अर्धा किलोमीटर परिसर हादरू शकतो. १२ कॅन बॅाम्ब पाटण्याच्या सहा किलोमीटरसभोवतालचा परिसर हादरवू शकले असते. या स्फोटकांना टायमर जोडण्यात आलेले नव्हते. त्यामुळे त्याचा स्फोट होण्याची शक्यता नव्हती. भरवस्तीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात स्फोटके आलीच कशी, असा प्रश्न तपास यंत्रणेला पडला आहे.

इतका मोठा शस्त्रसाठा नष्ट करणे आमच्या आवाक्यातले काम नाही, असे म्हणत पोलिसांनी तसेच एटीएस, स्पेशल ब्रांच, बॉम्बनाशक पथकांनी हात वर केले. त्यानंतर गृहमंत्रालयाकडे स्पेशल अर्ज करून हा साठा नष्ट करण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा संस्थेच्या टीमच्या (एनएसजी) बॉम्बनाशक पथकाला बोलावण्याचा निर्णय घेण्यात आला.

लॉजच्या २४ खोल्या तपासल्या
हे लॉज रामप्रवेश रॉय उर्फ नेताजी आहे. पोलिसांनी या घटनेनंतर शुक्रवारी लॉजच्या सर्वच खोल्यांची झडती घेतली. अनेक खोल्या बंद होत्या. दरवाजे तोडून पोलिस आत घुसले. पाच वर्षांपूर्वी येथे खासगी शाळा होती. ती बंद झाल्यानंतर नेताजीने विद्यार्थ्यांना खोल्या किरायाने देण्याचा उद्योग सुरू केला होता. नक्षलवादी येथे विद्यार्थी बनून राहत होते,असा पोलिसांचा संशय आहे.

झारखंड पोलिसांची टिप नक्षलवाद्यांवर संशय
स्फोटके सापडल्याप्रकरणी नक्षलवादी संघटना पीएलएफआयवर संशय व्यक्त करण्यात येत असून घरमालकास ताब्यात घेण्यात आले आहे. रांची पोलिसांनी दिलेल्या सूचनेवरून बिहार पोलिसांनी ही कारवाई केली. नक्षलवादी संघटना पीएलएफआयच्या सदस्याला अटक करण्यात आली होती. त्याने दिलेली स्फोटकांची माहिती पाटणा पोलिसांना देण्यात आली पोलिसांनी घटनास्थळी स्फोटकांचा साठाही जप्त केला.