Home | National | Other State | West Bengal Gets GI Certification For Rasgulla

रसगुल्ल्याचा जन्म ओडिशातला नव्हे, बंगालचाच; मिळवले जीआय मानांकन

वृत्तसंस्था | Update - Nov 15, 2017, 01:10 AM IST

रसगुल्ल्याचा जन्म पश्चिम बंगालमध्ये झाला की ओडिशात या वादावर अखेर पडदा पडला आहे. पश्चिम बंगालला रसगुल्ल्याच्या भौगोलिक

 • West Bengal Gets GI Certification For Rasgulla
  चेन्नई- रसगुल्ल्याचा जन्म पश्चिम बंगालमध्ये झाला की ओडिशात या वादावर अखेर पडदा पडला आहे. पश्चिम बंगालला रसगुल्ल्याच्या भौगोलिक ओळखीचे मानांकन (जिओग्राफिकल इंडिकेशन टॅग) मिळाले आहे. यामुळे रसगुल्ला या प्रसिद्ध खाद्यपदार्थाचा जन्म पश्चिम बंगालमध्ये झाल्याचे अधिकृतरीत्या सिद्ध झाले.

  जीआय टॅग एखाद्या वस्तू किंवा संपत्तीची भौगोलिक ओळख दर्शवतो. रसगुल्ल्याचा जन्म ओडिशात झाल्याचे सांगत २०१५ मध्ये त्यांनी जीआय टॅग मिळवण्यासाठी दावा दाखल केला होता. पश्चिम बंगालने यावर आक्षेप नोंदवत रसगुल्ला बंगालचा असल्याचे म्हटले होते. दोन्ही राज्यांनी आपापली समिती स्थापन करून रसगुल्ल्याचा इतिहास शोधण्याचे काम त्यांना लावले होते. जीआय टॅगसंबंधी निर्णय देणाऱ्या चेन्नईतील समितीने दोन्ही राज्यांतील समित्यांचे म्हणणे ऐकून प. बंगालच्या बाजूने निकाल दिला.

  ओडिशाचा दावा
  ओडिशात १३ व्या शतकापासून रसगुल्ला अस्तित्वात आहे. पुरीच्या इतिहासाशी याचा संबंध आहे. ‘भगवान जगन्नाथ एकदा आपल्या घरी आले तेव्हा रुसलेल्या लक्ष्मीने दरवाजा बंद केला होता. देवीची मनधरणी करण्यासाठी जगन्नाथाने खीर मोहन नावाचा खाद्यपदार्थ समोर ठेवला. याची चव आवडल्याने देवीने दरवाजा उघडला. वास्तविक पाहता खीर मोहन हा पदार्थच रसगुल्ला होता.’ या पौराणिक कथेवरून रसगुल्ला ओडिशाचा असल्याचे स्पष्ट होते, असा दावा करण्यात आला होता.

  दावा फेटाळला
  खीर मोहन आणि रसगुल्ल्यामध्ये फरक आहे. खीर मोहन आकाराने मोठा व पांढरा नव्हे, तर पिवळसर असतो.

  बंगालचा दावा
  १८६८ मध्ये कोलकात्यातील बाग बाजारात नोबीन चंद्र दास नावाच्या प्रसिद्ध हलवायाने तयार केलेला रसगुल्ला सेठ रायबहादूर भगवानदास बागला यांच्या मुलास खूप आवडला. त्यानंतर ही मिठाई लोकप्रिय झाली.

  दावा मंजूर
  पश्चिम बंगालचा दावा मंजूर करण्यात आला असून रसगुल्ला पूर्णपणे पांढरा आणि आकाराने लहान असल्याचे चेन्नईच्या समितीने म्हटले.
  याबद्दल वाद काय?
  - ओडिशा सरकारने रसगुल्ला या पदार्थासाठी भौगोलिक संकेतांक (जीआय टॅग) मिळावा, अशी मागणी केल्यामुळे हा विषय पुढे आला होता. ओडिशा सरकारच्या म्हणण्यानुसार, आज रसगुल्ला म्हणून ओळखला जाणारा पदार्थ सुमारे सातशे वर्षांपूर्वी ओडिशात शोधला गेला आणि भगवान जगन्नाथ व देवी महालक्ष्मी यांच्या विशेष नैवेद्यात त्याचा समावेश होता.
  - ओडिशाच्या दाव्यास पश्चिम बंगालने आक्षेप घेतला. रसगुल्ल्याचे उगमस्थान पश्चिम बंगालच असल्याचा दावा पश्चिम बंगालने केला.
  पश्चिम बंगालने केला काय दावा
  - ओडिशाच्या रसगुल्ल्यात वापरण्यात येणारा रस आणि बंगालच्या रसगुल्ल्यात वापरण्यात येणारा रस आणि स्पंज वेगवेगळे आहेत. त्यांचे घनत्व देखील वेगळे आहे असा युक्तीवाद पश्चिम बंगालकडून करण्यात आला. रसगुल्ला सर्वप्रथम नवीन चंद्र यांनी बनवला, अशी बंगालमध्ये मान्यता असल्याचे सांगण्यात आले. अखेर त्यांचाच विजय झाला.
  ममताचे ट्विट
  ब्रिटनच्या दौऱ्यावर असणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी यावर ट्विट करत 'जीआय टॅग' मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला.
  पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती
 • West Bengal Gets GI Certification For Rasgulla
  रसगुल्ल्याचा भौगोलिक संकेतांक (जीआय टॅग) पश्चिम बंगालला देण्यात आला आहे.
 • West Bengal Gets GI Certification For Rasgulla
  याबद्दल मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ट्विटरच्या माध्यमातून बंगाली जनतेचे अभिनंदन केले आहे.

Trending