डेहराडून - केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) उत्तराखंडमधील स्टिंग सीडी प्रकरणात भाजपची चौकशी का करत नाही, असा प्रश्न राज्याचे मुख्यमंत्री हरीश रावत यांनी बुधवारी उपस्थित केला. राज्यात अलीकडेच उद्भवलेल्या राजकीय पेचाच्या काळात झालेल्या घोडेबाजारात सहभागी प्रमुख व्यक्तींचीही चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी सीबीआयकडे केली आहे.
स्टिंग प्रकरणात सीबीआयने दुसऱ्यांदा चौकशी केल्यानंतर रावत येथे परतले. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, या संपूर्ण प्रकरणात संबंध नसलेल्या तिसऱ्या व्यक्तीशी संभाषण केल्याबद्दल सीबीआयने मला चौकशीसाठी समन्स पाठवले. मग या घोडेबाजार नाट्याशी संबंधित प्रमुख व्यक्ती आणि फायदा झालेल्या व्यक्तींची चौकशी का केली जात नाही, असा माझा सीबीआयला प्रश्न आहे. त्यापैकी अनेकांची नावे स्टिंग सीडीत आहेत. मग त्यांना चौकशीसाठी का बोलावले जात नाही? या घोडेबाजाराचा लाभ कोणाला झाला आहे? मी १० आमदार गमावले, तर भाजपला १० आमदार मिळाले. घोडेबाजारामुळे ज्याने १० आमदार गमावले त्याची चौकशी होते आणि ज्यांना फायदा झाला त्यांना मात्र सोडून दिले जाते. रावत म्हणाले की, मी माझी बाजू सीबीआयसमोर मांडली असून घोडेबाजारातील भाजपची ‘सक्रिय’ भूमिका दाखवणारी कागदपत्रे पुरावा म्हणून सादर केली आहेत. १८ मार्चला विधानसभेत पेच निर्माण झाला होता.