आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Why Should Classical Literature Not Teach ? Youths Question In Jaipur Lit Fest

अभिजात साहित्य का शिकवत नाही? जयपूर लिट फेस्टमध्ये तरूणांचा सवाल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर - भारतातील शास्त्रीयदृष्ट्या समृद्ध असलेले साहित्य जगभरात पोहोचावे म्हणून स्थापन
करण्यात आलेली ‘द मूर्ती क्लासिकल लायब्ररी ऑफ इंडिया’ गुरुवारी सुरू करण्यात आली. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी ‘इन्फोसिस’चे संस्थापक एन. आर. नारायणमूर्ती यांचे चिरंजीव रोहन यांनी या लायब्ररीची जबाबदारी स्वीकारली असून जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये तरुणाईलाही याची भुरळ पडली.

या लायब्ररीची संकल्पना उमगल्यावर शाळा किंवा महाविद्यालयात आम्हाला भारतीय अभिजात साहित्याऐवजी परदेशी, मुख्यतः इंग्रजी साहित्य का शिकवले जाते, असा सवाल अनेक तरुणांनी आणि शिक्षकांनी केला तेव्हा उपस्थितांना त्यांच्या लहानपणी मारून मुटकून शिकलेल्या इंग्रजी कवितांची आठवण झाली. पाच प्राचीन भाषांमधून काव्य ऐकल्यानंतर त्यांना हा प्रश्न पडणे साहजिक वाटले. अमर्त्य सेन, नारायणमूर्ती आणि या मालिकेचे जनरल एडिटर शेल्डन पोलॉक यांच्या हस्ते पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.
शिक्षकांचाच विरोध : अनेकदा शिक्षकच असे प्रयत्न हाणून पाडतात. आपण जर अमेरिकेचे अपरिचित विश्व कवितेमधून डोळ्यांसमोर आणू शकतो तर तेरीगाथा वा अबुल फझलचे काव्य व सुरदासांचे काव्य का नाही शिकवू शकत? ते तर आपल्याच मातीतले आहे, असा सवाल एका शिक्षिकेने उपस्थित केला.
तरुणांना वेड लागावे
शेल्डन पोलॉक या हार्वर्ड विद्यापीठातील भाषातज्ञाने संस्कृत श्लोक म्हणत बोलायला सुरुवात केली. ते म्हणाले, जे कठीण आहे, वेगळे आहे त्याचे वेड तरुण पिढीला लागले पाहिजे. वेगळेपणासाठी असे साहित्य वाचलेच पाहिजे. एक माणूस म्हणून किती पद्धतीनी आपण जगू शकतो ते यातून कळते. भारतीय व दक्षिण आशियाई लोक त्यांच्या परंपरांपासून दूर गेले आहेत, जात आहेत.
४० पुस्तके येणार
‘द मूर्ती क्लासिकल लायब्ररी ऑफ इंडिया’ या प्रकल्पांतर्गत येत्या काही वर्षांत १४ भारतीय भाषा व १० लिप्यांमधील ४० पुस्तके त्यांच्या इंग्रजी अनुवादासह प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. गेल्या दोन सहस्त्रकातील अभिजात भारतीय साहित्य उपलब्ध करून देणे हा या लायब्ररीच्या स्थापनेचा मुख्य उद्देश आहे.
हार्वर्डची साथ : प्राचीन भारतीय साहित्य नव्याने इंग्रजीमध्ये लोकांसमोर आणण्याचा
रोहनचा प्रयत्न आहे. त्याला हार्वर्ड विद्यापीठाची साथ मिळाली. पंजाबी, पाली, फारसी,
तेलुगु व ब्रिज या भाषांमधील काव्यांची झलक व त्याचा इंग्रजी अनुवाद त्या त्या
भाषातज्ञाकडून ऐकल्यानंतर हा प्रश्न प्रामुख्याने समोर आला. दिग्गज लेखकांचे इंग्रजी
साहित्य उत्तमच, परंतु आपल्या देशात हजारो वर्षांपूर्वी लिहिलेले काहीच आपल्या समोर
आले नाही, असे रोहन म्हणाले.