कोलकाता - शारदा चिट फंड घोटाळ्यात एकापाठोपाठ नेते अडकत असल्याने संतापलेल्या तृणमूल काँग्रेस नेत्या ममता बॅनर्जी यांनी शनिवारी थेट पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. सहाराप्रमुख सुब्रोतो रॉय यांच्यासोबतचा मोदींचा फोटो दाखवत आम्ही सीबीआयकडे पंतप्रधानांच्या अटकेची मागणी करायची काय? असा जाहीर सवाल ममता बॅनर्जी यांनी विचारला.
केंद्र सरकारविरोधात थेट लढाईचा इशारा देत दिल्लीत मोर्चा काढण्याची घोषणाही ममतांनी केली. त्यांच्या मंत्रिमंडळातील परिवहन व क्रीडामंत्री मदन मित्रा यांना सीबीआयने शुक्रवारी शारदा चिट फंड घोटाळ्यात अटक केली आहे. त्यांच्याविरोधात गैरव्यवहार, गुन्हेगारी कटाचा आरोप आहे. मित्रांसह तृणमूलच्या चार नेत्यांना अटक झाली आहे. त्यामुळे ममता संतप्त आहेत. राजकीय पातळीवर तृणमूलशी लढता येत नसल्याने सीबीआयचा वापर करून भाजप राजकारण करत असल्याचा आरोप ममतांनी केला.