गुरुदासपूर (पंजाब) - दहशतवाद ही राष्ट्रीय समस्या असल्याचे पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल सोमवारी म्हणाले. त्याचवेळी जर गुप्तचर संस्थांना अशा प्रकारच्या हल्ल्याची माहिती मिळाली होती, तर घुसखोरी रोखण्यासाठी सीमेवर नाकेबंदी करायला हवी होती, अशा शब्दांत बादल यांनी नाराजीही व्यक्त केली.
हल्ला केलेले दहशतवादी हे पंजाबमधून आलेले नाही. ते सीमेवरून घुसखोरी करून आले आहेत त्यामुळे अशा प्रकारची घुसखोरी रोखण्यासाठी सीमेवर नाकेबंदी करण्याची जबाबदारी ही, गृहखात्याची असते. मग माहिती असूनही अशी नाकेबंदी का केली नाही ? असा सवाल बादल यांनी केला. पंजाबमध्ये अनेक वर्षांनंतर अशा प्रकारचा हल्ला झालेला आहे. पण दहशतवाद ही राष्ट्रीय समस्या आहे. ती राज्याची समस्या नाही. त्यामुळे राष्ट्रीय धोरणाप्रमाणेच यावर तोडगा काढावा लागणार असल्याचेही बादल म्हणाले.
पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल हे तापाने फणफणले असल्याने आजारी आहेत. पण तरीही ते सुरक्षा संस्थांच्या संपर्कात असून या हल्ल्याबाबत माहिती घेत आहेत. आमचे अधिकारी अत्यंत शौर्याने हल्ल्याला उत्तर देत आहेत. माझी तब्येत ठीक नसली तर दर 10-15 मिनिटांनी संपर्कात राहत असल्याचे बादल म्हणाले आहेत. ऑपरेशन पूर्ण झाल्यानंतर यासंदर्भात सविस्तर चर्चा करून आगामी काळात असे हल्ले टाळण्यासाठी, प्रयत्न केले जातील, असे ते म्हणाले.