फोटो : शेल्टर होममध्ये मार्गदर्शन करताना हेमा मालिनी
मथुरा - बॉलीवूडची ड्रीम गर्ल आणि मथुरा येथील खासदार हेमा मालिनी प्रथमच त्यांच्या एका वक्तव्यामुळे अडचणीत आल्या आहेत. 'बिहार आणि बंगालच्या विधवांनी त्यांच्या राज्यांमध्येच राहायला हवे. त्यांनी वृंदावनमध्ये येऊन गर्दी वाढवयला नको' असे वक्तव्य हेमा मालिनी यांनी केले. तसेच 'वृंदावनमध्ये राहणा-या विधवांकडे बँक बँलेंस, चांगले उत्पन्न आणि इतर सुविधा आहेत. पण तरीही त्यांनी भीक मागण्याची सवय लागलेली आहे, असेही हेमा मालिनी म्हणाल्या. हेमा मालिनी यांच्या या वक्तव्यावर चौफेर टीका होत आहे. तर मथुरेच्या स्थानिक भाजप नेत्यांनी हेमा मालिनी यांच्या या वक्तव्याचे समर्थन केले आहे.
मथुरा येथील खासदार हेमा मालिनी यांनी सोमवारी हे वक्तव्य केले. मतदार संघाचा दौरा करण्यासाठी त्या याठिकाणी आल्या होत्या. वृंदावन हाही मथुरेचाच एक भाग आहे. विशेष म्हणजे उत्तर प्रदेशच्या वृंदावनचा पवित्र शहरांमध्ये समावेश केला जातो. तेथे हजारोंच्या संख्येने विधवा आहेत.
शहरात जागेची अडचण
वृंदावनच्या एका कार्यक्रमात बोलताना हेमा म्हणाल्या की, 'वृंदावनमध्ये 40,000 विधवा आहेत. मला वाटते शहरात आता आणखी जागा शिल्लक नाही. मोठ्या संख्येने बंगालमधून महिला येत आहेत. ते योग्य नाही. त्या बंगालमध्येच का थांबत नाहीत. त्याठिकाणीही चांगली मंदिरे आहेत. बिहारवरही हीच बाब लागू होते. दूरवस्थेत असलेल्या एका शेल्टर होमची पाहणी केल्यानंतर हेमा यांनी हे वक्तव्य केले. याबाबत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.