उदयपूर - मानपूर येथील मोती मीणाची ही कहाणी आहे. उदयपूरपासून सुमारे ६० किमीवर डोंगराळ भागातील खजुरी, बेडावल आणि सती की सोरी या १२ हजार लोकवस्तीच्या तीन पंचायती आहेत. येथील २ हजार घरांमध्ये स्वत: जाऊन मोती त्यांची तपासणी करते. आजारांबाबत जागृती करते. शिवाय प्रत्येक गावात एका आरोग्यसेविकेला प्रशिक्षण देत आहे. २० महिलांना तिने प्रशिक्षित केले आहे.
सात वर्षांपूर्वी वेळेवर उपचार न मिळाल्याने पतीचा मृत्यू झाला होता. डाॅक्टरांनाही आजाराचे निदान झाले नव्हते. पतीच्या निधनाचा मोठा धक्का मोतीला बसला. खासगी रुग्णालयात उपचार घेण्याएवढेही पैसे नव्हते. त्यामुळे सलूम्बर तालुक्याच्या सरकारी रुग्णालयात पतीवर उपचार केले. परंतु तोवर उशीर झाला होता. तीच्या मृत्यूनंतर सासू-सासऱ्यांनी मोतीला घराबाहेर पडण्यास मनाई केली. गावांतील आरोग्य व्यवस्थेची दुरवस्था पाहून मोती चिंतित होती. त्यामुळे यापुढे कोणाही ग्रामस्थाचा जीव जाऊ देणार नाही, असा निर्धार तिने केला. आरोग्यसेविका होऊन लोकांना जागरूक करीन आणि बीहडमध्ये जाऊन लोकांवर उपचार करीन, असा मनोनिग्रह झाला.तेव्हा माेती पाचवीपर्यंत शिकलेली होती. पुढे तिने दहावीपर्यंत शिक्षण घेतले. त्याच काळात तेथे जिल्हास्तरीय आरोग्य शिबीर झाले. शिबिराला जाण्यास सासरच्या लोकांनी मनाई केली. परंतु शिबिरासाठी मोती घरातून पळून गेली. परत आल्यावर घरच्यांनी घराबाहेर काढले. मुलाबाळांना घेऊन मग ती माहेरी आली.
पुढे २००९ मध्ये भरलेल्या आरोग्य शिबिरात काम करण्याची संधी तिला मिळाली. नंतर २०१२मध्ये छत्तीसगडच्या बिलासपूरमध्ये तिने प्रशिक्षण घेतले. ९ महिने मुलांपासून दूर राहावे लागले. मुलांची आठवण आली की पतीचा मृत्यू आठवून मन खंबीर करायची. गावांतील अनेक बाळंतपणे मोतीने केली आहेत.
बेडावलजवळील सोरी पंचायतीच्या कुकडा गावात राहणाऱ्या वक्ता सांगतात, मोतीदीदीमुळेच आज माझा मुलगा जिवंत आहे. त्या दिवशी दीदी दुसऱ्या गावात होती. घरातच मुलाचा जन्म झाला. परंतु नाळ अडकून राहिली. रक्तस्त्रावही होत होता. दीदीला बोलावले. लगेच उपचार सुरू झाला. यावर मोती म्हणतात, वक्ताला सलूम्बरला नेले असते तर तेथील डाॅक्टरांनी उदयपूरला पाठवले असते. यात वेळ गेला असता. यात कदाचित बाळाचा मृत्यूही ओढवला असता.
बालमृत्यूच्या दरात ३०% घट
आजही अनेक गावांत १०८ अॅम्ब्युलन्स पोहोचू शकत नाही. तेथे जाऊन मोती काम करते. आधी उपचाराची सोय आणि जागृती नसल्याने १० पैकी ४ अर्भक बाळंतपणात दगावली जायची. परंतु आता हे प्रमाण चांगलेच कमी झाले आहे. फार झाले तर एखाद्या नवजात बाळाचा मृत्यू होतो. - उदयलाल, सरपंच, बेड़ावल, ता. सलूम्बर