आगरतळा (त्रिपूरा)- येथून सुमारे 25 किलोमीटर दूर असलेल्या गोविंद सरदार पारा परिसरातील एका पत्नीने पतीसाठी जहाल विष टाकलेला चहा तयार करुन आणला. तिला पतीला ठार मारायचे होते. पण या दरम्यान त्यांच्या दोन मुलींनी तो चहा प्यायला. यात चार वर्षीय मुलीचा मृत्यू झाला तर 12 वर्षीय मुलीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
पोलिस आयुक्त उत्तम भौमिक यांनी सांगितले, की पत्नीचे नाव सिताराणी देबबर्मा (वय 29) तर पतीचे नाव गौतम देबबर्मा असे आहे. त्यांच्यात टोकाचा कौटुंबीक कलह होता. सिताराणीने घरात विष आणून ठेवले होते. पतीच्या चहात तिने हे जहाल विष मिसळले. पण तिने दिलेला चहा गौतम यांनी घेतलाच नाही. त्यांच्या दोन मुली श्रीया (वय 4) आणि मेरी (वय 12) यांनीच चहा प्यायला. लगेच त्यांना उलट्या होऊ लागल्या. प्रकृती गंभीर झाली. त्यानंतर गौतम यांनी दोघींना रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान, रुग्णालयात नेत असताना श्रीयाचा मृत्यू झाला. मेरीची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे. पोलिसांनी सिताराणीला अटक केली आहे.