आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Wildlife Trust To Document Butterflies In Nagaland Under Rapid Action Project

नागालँडमध्ये होणार फुलपाखरांची शेती!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुवाहाटी - नागालँड हे फुलपाखरांचे नंदनवन मानले जाते. विविध प्रजातींची हजारो फुलपाखरे या भागात सापडतात. फुलपाखरांच्या संवर्धनासाठी या प्रजातींचे वर्गीकरण करण्यासाठी वाइल्डलाइफ ट्रस्ट ऑफ इंडियाने प्रथमच शीघ्र कृती प्रकल्प हाती घेतला आहे. पूर्वोत्तर राज्यांत राबवला जाणारा हा अशा प्रकारचा पहिलाच प्रकल्प आहे. यात विविध प्रकारच्या फुलपाखरांच्या प्रजातींना कागदोपत्री मूर्त स्वरूप प्रदान करण्यात आले आहे.

नागालँडच्या सुंग्रो रेंजमधील डोयांग अभयारण्य परिसरात हा प्रकल्प राबवला जाणार असल्याचे वाइल्डलाइफ ट्रस्टच्या प्रवक्त्यांनी सांगितले. नागालँडमधील पक्षिप्रेमी आणि तज्ज्ञ ओपोथुंग जामी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम घाट, दक्षिणेकडील आणि पूर्वेकडील वर्षारण्ये यामुळे आपल्याकडे वनस्पती आणि प्राणी, पक्षी यांच्या विविध जाती सापडतात. फुलपाखरेदेखील याला अपवाद नाहीत.

एकूण १५०० जाती
आपल्या देशात फुलपाखरांच्या तब्बल पंधराशे जाती सापडतात. पश्चिम घाटातील चांदोली, कोयना, राधानगरी, अंबोली या अभयारण्यांत व आसपासच्या परिसरात ‘सदर्न बर्डविंग’ हे पंखांना सोनेरी किनार असलेले, आकाराने मोठे आणि सहसा पाहायला न मिळणारे फुलपाखरू सापडते. दक्षिण भारतातील अरण्यांमध्ये तमिळ लेस विंग हे फुलपाखरू मोठ्या प्रमाणात आढळते. ईशान्येला असणार्‍या वर्षारण्यांमध्ये फुलपाखरांच्या विविध जाती आढळतात. तेथील काही जाती जगामध्ये अत्यंत दुर्मिळ जाती मानल्या जातात. तर ड्रॅगन टेल, गोल्डन बर्डविंग, नॉर्दर्न जंगलक्वीन, पिकॉक बटरफ्लाय यासारख्या अत्यंत आकर्षक अशा फुलपाखरांच्या जाती आढळतात. पूर्वांचल हे फुलपाखरांचे नंदनवनच समजले जाते. अरुणाचल प्रदेश, मेघालय, नागालँड, सिक्कीम या राज्यांत फुलपाखरांच्या अनेक जमाती अढळतात.

अभ्यासकांना मदत होईल
भारतातील जैवविविधतेचा अभ्यास करण्यासाठी दरवर्षी हजारो परदेशी अभ्यासक येतात. प्रामुख्याने पूर्वाेत्तर राज्यांतील प्राणिमात्रांच्या अभ्यासात त्यांना विशेष रस असतो. मात्र, येथील जैवविविधतेच्या नोंदी नसल्याने बर्‍याच अडचणी निर्माण होतात. फुलपाखरांच्या प्रजातींच्या नोंदी झाल्याने त्यांना शास्त्रीय महत्त्व प्राप्त होईल.

युवकांचा सहभाग
फुलपाखरांच्या प्रजातींचा बचाव करण्यासाठी युवकांमध्ये जनजागृती करणे महत्त्वाचे आहे. यासाठी सुंग्रोच्या सरकारी माध्यमिक शाळेतील सुमारे ५० एनसीसी कॅडेट्सनी राष्ट्रीय कॅडे्टससोबत मिळून नागालँडमधील ग्रामीण भागात फुलपाखरू संवधर्नासाठी जनजागृती मोहीम हाती घेतली आहे.