आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जदयूच्या खात्यावर तीन दिवसांत ३० लाख रु., आयकर विभागाने स्रोत विचारला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा/हाजीपुरा - बिहारमधील निवडणुकीचा प्रचार जोरात असताना सत्ताधारी संयुक्त जनता दलाच्या खात्यात गेल्या तीन दिवसांत ३० लाख रुपये जमा झाले आहेत. त्यावरून आयकर विभागाने पक्षाला नोटीस जारी करून या पैशाचा स्रोत विचारला आहे. त्याचबरोबर समाजवादी पार्टीच्या खात्यात जमा झालेल्या १ लाख रुपयांप्रकरणीही विभागाने नोटीस देऊन दोन दिवसांत स्रोत कळवण्यास सांगितले आहे.

विभागाच्या सूत्रांनी सांगितले की, जदयूचे पाटण्यातील पीएनबी बँकेत खाते आहे. त्यात १४, १५ व १६ ऑक्टोबर या दिवशी प्रत्येकी १० लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. तसेच समाजवादी पार्टीच्या खात्यावरही एक लाख रुपये जमा झाले आहेत. त्याबाबत पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांना नोटीस बजावण्यात आली असून या पैशाचा स्रोत काय आहे याचा खुलासा करण्यास सांगण्यात आले आहे. जदयूचे प्रदेशाध्यक्ष वशिष्ठ नारायणसिंह यांनी सांगितले की, ते प्रचार दौऱ्यावर आहेत. आयकर विभागाने पाठवलेल्या नोटिसीची आपल्याला कल्पना नाही. काही पत्र आले असेल तर त्याला उत्तर दिले जाईल. सपानेही नोटिसीबाबत अनभिज्ञता दाखवली. निवडणुकीत होणारा काळ्या पैशाचा वापर रोखण्यासाठी आयोगाच्या आदेशानुसार आयकर विभाग प्रत्येक ट्रँझॅक्शनवर लक्ष ठेवण्याचे काम करत आहे. संशयित व्यवहारांची माहिती तातडीने कळवण्यासाठीही बँक व्यवस्थापनाला सांगण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
वेळ संपली, मांझींनी भाषण सोडले
वैशाली विधानसभा मतदारसंघात फतेहपूर, अफजलपूर गावात रात्री प्रचाराचा वेळ संपल्याने माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांना त्यांचे भाषण अर्ध्यावर थांबवावे लागले. वेळ संपताच निवडणूक अधिकारी तथा बीडीओ स्टेजवर येऊन समोर उभे ठाकले. त्यांना पाहून आचारसंहिता भंगाच्या भीतीने मांझी यांनी भाषण तसेच सोडून दिले. निवडणुकीच्या वेळी बड्या नेत्यांनाही कशी भीती वाटते याची सभास्थळी चर्चा होती.