आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टायगर रिझर्व्हमध्ये पहिली महिला गाइड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वीस वर्षांची सुलोचना राय गेल्या दहा दिवसांपासून रोज पहाटे साडेचार वाजता उठत आहे. या वेळेत येथील तापमान १० अंश सेल्सियसपेक्षाही कमी असते. भारत-नेपाळ सीमेवरील चंदन चौकीमध्ये आपल्या घरी स्वयंपाक करून ती साडेसहा वाजता १५ किमीवरील दुधवा नॅशनल पार्कमध्ये जाते. सात वाजता पर्यटकांसोबत तिला आतमध्ये जावे लागते. दुधवामध्ये १५ नोव्हेंबरपासून चार मुलींनी प्रशिक्षित गाइड म्हणून काम सुरू केले आहे. देशातील कोणत्याही व्याघ्र प्रकल्पामध्ये ती पहिली महिला फॉरेस्ट गाइड आहे. त्यांच्यातील तीन अत्यंत मागास थारू आदिवासी जमातीच्या आहेत. सायंकाळची पाळी संपल्यानंतर त्या आठ वाजेपर्यंत घरी पोहोचतात.

१८ वर्षांची शनिफा खान चाळीस किमीवरील मैलानीवरून येते. ती कला शाखेच्या द्वितीय वर्षात शिकते. भाऊ मोटारसायकलवरून सोडतो व पुन्हा घेण्यास येतो. निसर्गाच्या प्रेमामुळे ती या कामात जोडली आहे. साधारण २०० उमेदवारांमध्ये या पाच जणींची निवड झाली असून त्यांना केवळ ३०० रुपये प्रति ट्रीप मिळते. पण केवळ रविवारी जास्त पर्यटक येतात, असे तिने सांगितले.

अभयारण्याच्या द्वारापासूनच सुलोचना कसलेल्या गाइडप्रमाणे माहिती देण्यास सुरुवात करते. दुधवा नॅशनल पार्क ६८० चौरस किमी क्षेत्रात विस्तारले आहे. येथे वाघांशिवाय हिंस्र प्राण्यांच्या १३ जाती आहेत, सात प्रकारचे हरिण, चिमण्यांच्या ३५० जाती असून एक शिंगी गेंडा आसामनंतर येथे दिसतो. वनामध्ये कोणत्या गोष्टीस मनाई आहे. वाघांच्या पंजाच्या ठशांवरून तो नर की मादी तसेच त्यांना येथून जाऊन किती वेळ झाला हे ती सांगते. विशेष म्हणजे पावणेपाच फूट उंचीच्या सुलोचनाने वन्यजीवांवरील कोणताही अभ्यासक्रम केला नाही. ती बीएच्या तिसर्‍या वर्षात शिकत आहे. थारू जातीच्या लोकांना यासाठी कोणत्या कोर्सची गरज भासत नसल्याचे तिचे म्हणणे आहे.

आम्ही लहानपणापासून वनात राहतो. दुधवामध्ये या वेळी महिला गाइडसोबत महिला सुरक्षा रक्षकही तैनात आहेत. सर्व १८ थारू आहेत. दुधवा पार्कचे उपसंचालक व्ही.के.सिंह म्हणाले, आमच्या वनाला सर्वात जास्त नुकसान थारू महिलांकडून होते. त्यामुळे वनसंपत्ती वाचवण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे आणि त्याचा चांगला फायदा झाला. दुधवा वन परिक्षेत्रात तैनात आठ महिलांमध्ये निहारिका, नीलम, किरण आणि संतोषी यांचा समावेश आहे. सर्व जणी १९ ते २२ वयोगटांतील असून त्यांना तैनात करण्यापूर्वी आवश्यक प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यांना शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले, मात्र सध्या त्यांच्याकडे काठी आहे. पुरुष सुरक्षा रक्षकाकडे रायफल असते. त्यांना वर्दीसोबत कॅम्पसमध्ये राहण्यास निवासस्थान मिळते. दुधवाचे वनाधिकारी टी.आर. दोहरे म्हणाले, त्या दिवसा रात्री कधीही गस्तीवर जातात. एका थारू रक्षकाने पुराच्या पाण्यात उडी टाकून लाकूड माफियाला पकडले होते. बिली अर्जन सिंह ट्रस्टने त्याला १५ हजार रुपयांचा मीरा-बलराम पुरस्कार दिला आहे.

निहारिका म्हणाली, आमच्या समाजातील लोक कायद्याचे पालन करत नाहीत. दुधवाच्या आसपास ३५ गावे आहेत. व्याघ्र प्रकल्पातून लाकूड, गवत नेण्यास मनाई आहे. वन अधिकार कायदा आदिवासी अधिनियम येथे लागू होत नाही.