बिजनौर (उत्तर प्रदेश) – पुरुषांच्या गुंडागर्दीचे किस्से सर्वश्रुत आहेत. पण, बिजनौर येथे काल (बुधवार) ममता अग्रवाल नावाच्या महिलेची गुंडागिरीने नागरिक उचंबित झाले. वादग्रस्त जमिनीवर ताबा मिळवण्यासाठी ममता हिने कमरेत पिस्तुल खोचून शेतात बहरलेल्या पिकांवर ट्रॅक्टर चालवला. शिवाय, याला विरोध करणा-या एका महिलेच्या अंगावरूनही ट्रॅक्टर चढवण्यास तिने मागे पुढे पाहिले नाही. विशेष म्हणजे ही घटना जिल्हाधिकारी यांच्या घरापासून हाकेच्या अंतरावर घडली. दैव बलवत्तर म्हणून अंगावरून ट्रॅक्टर गेलेली महिला सुखरुप बचावली.
काय आहे प्रकरण
जिल्हाधिकारी यांच्या घरासमोरच जमिनीचा एक तुकडा आहे. ही जमीन चर्चच्या मालकीची आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे तर चर्चकडून आपण ही जमीन विकत घेतल्याचा दावा ममता हिने केला आहे. त्यातूनच या जमिनीवर ताबा मिळवण्यासाठी तिने या जमिनीवर ट्रॅक्टर चालवला. याला परिसरातील काही महिलांनी विरोध केला तर त्यातील एका महिलेच्या अंगावरही तिने ट्रॅक्टर चढवला. हा प्रकार तब्बल एक तास सुरू होता. या बाबत नागरिकांनी पोलिसांना कळवले. पण, पोलिस उशिराने घटनास्थळावर आले. तोपर्यंत अनेकांनी हा प्रकार आपल्या स्मार्टफोनमध्ये कैद केला. मीडियामध्ये याचे वृत्त येताच पोलिसांनी ममता हिला ताब्यात घेतले.
पुढील स्लाइडवर पाहा घटनेशी संबंधित छायाचित्रे