आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आसाम: जादूटोनाच्या संशयाने महिलेवर तुटून पडला 200 जणांचा जमाव, केला शिरच्छेद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुवाहाटी - आसाममध्ये 63 वर्षांच्या वृद्ध महिलेला डायन असल्याचे सांगत दोनशे जणांच्या जमावाने घरातून ओढून मारहाण केली आणि नंतर हिंसक जमावाने तिचे शीर धडावेगळे केले. माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना सोनितपूर जिल्ह्यातील विमाजुली गावात सोमवारी घडली. जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक मानवेंद्र देव रॉय यांनी या वृत्ताला दुजोरा देत म्हटले, मोनी ओरंग नावाच्या महिलेला जादूटोना करत असल्याच्या संशयावरुन जमावाने घरातून बाहेर बोलवले आणि तिच्यावर हल्ला केला.
पुजाऱ्यावर लोकांना चिथावणी दिल्याचा आरोप
गावातील एका पुजाऱ्याने गावकऱ्यांना महिलेविरोधात भडकवल्याचा आरोप आहे. पुजाऱ्याने चिथावणी दिल्यानंतर लोक महिलेच्या घराबाहेर जमले आणि त्यांनी तिला ओढत घराबाहेर काडून बेदम मारहाण केली. तिचे कपडे फाडले. त्यानंतर हिंसक जमावाने धारदार शस्त्रांनी तिच्यावर हल्ला करत तिचा शिरच्छेद केला.

पोलिसांना रोखून धरले
जमाव एवढा हिंसक झाला होता, की त्यांनी पोलिसांनाही घटनास्थळी येण्यापासून रोखले होते. सहायक पोलिस आयुक्त समद हुसैन यांनी एका पथकासह गावात प्रवेश केला आणि जमावाला पांगवले. त्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठविला.
सात जणांना अटक, शस्त्र जप्त
विमाजुली गावातील सात जणांना अटक करण्यात आल्याचे पोलिस अधीक्षक रॉय यांनी सांगितले. त्यासोबतच पोलिसांनी ज्या शस्त्राने शीर कापण्यात आले ते जप्त केले आहे. आता गावातील परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...