(फोटोः पीडित महिला आणि अटक करण्यात आलेले आरोपी)
जयपूर- राजसमंद जिल्ह्यातील एका गाव पंचायतीने दिलेल्या अजब आदेशावरून एका 40 वर्षीय महिलेला विवस्त्र करून तिच्या चेहर्यावर काळे फासून गावातून गाढवावरून धिंड काढण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गावातील 39 लोकांना अटक केले आहे. तसेच पीडित महिलेसह तिच्या कुटूंबाला पोलिस संरक्षण देण्यात आले आहे.
चारभुजा पोलिस ठाण्याचे एसएचओ योगेश चौहान यांनी सांगितले की, ही घटना शनिवार सायंकाळी आदिवासी बहुल थुरावड गावात घडली. गावपंचायतीच्या आदेशानुसार आरोपींनी पीडितेला विवस्त्र करून तिच्या चेहर्यावर काळे फासले. एवढेच नव्हे तर पीडितेला विवस्त्र अवस्थेत गाढवावर बसवून गावातून फिरवले. आरोपींमध्ये गाव पंचायतीचेही सदस्य आहेत. पीडित महिलेला पंचायतने हत्येंच्या गुन्ह्याखाली ही शिक्षा सुनावली होती. पीडित महिलेवर तिचा पुतण्याच्या हत्येचा आरोप आहे.
पीडितेचे पती उदय सिंह याने पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी गावातील 39 आरोपींना अटक केले आहे. आरोपींमध्ये पीडितेच्या कुटूंबातील नऊ सदस्यांचा समावेश आहे. जिल्हाधिकारी के.सी.वर्मा आणि एस.पी.श्वेता धनकर यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेवून रविवारी थुरावड या गावाचा दौरा करून पीडितेची विचारपुस केली.