आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हात जोडून मिळवला गुन्हेगारीवर विजय,छत्तीसगडच्या महिलांच्या पुढाकारातून घटले गुन्हे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिलासपूर - छत्तीसगडच्या बिलासपूर शहरापासून 7 किलोमीटर अंतरावर लोखंडी गाव आहे. अमली पदार्थांच्या व्यवसायासाठी हे गाव कुप्रसिद्ध आहे; पण गेल्या काही महिन्यांपासून गावाचा चेहरा बदलत आहे. सुमारे पाच हजार लोकसंख्या असणा-या या गावातील 700 महिलांनी गावातून अमली पदार्थांचा व्यवसाय आणि गुन्हेगारी संपवण्याचा निर्धार केला आहे.
रोज रात्री सुमारे दोन ते तीन तास त्या गावामध्ये फिरून निगराणी करतात. यादरम्यान महिलांना कोणी दारू पिऊन गोंधळ घालताना किंवा संशयितपणे फिरताना आढळले, तर त्या हात जोडून त्याला वागणे बदलण्याची विनंती करतात. विनंतीनंतरही वर्तणुकीमध्ये बदल न झाल्यास पोलिसांकडे तक्रार करतात.यासाठी गुलाबी गँगकडून प्रेरणा मिळाल्याचे महिलांनी सांगितले. गुलाबी गँग वेळ-प्रसंगानुसार काठ्यांचा वापर करते. मात्र, लोखंडी गावातील महिला अहिंसेच्या मार्गाने गुन्हेगारी संपवण्यासाठी झटत आहेत.
गुन्हेगारीच्या अतिरेकाने एकवटली स्त्रीशक्ती
लोखंडी येथील माजी सरपंचांची हत्या झाल्यानंतर गावात अशा प्रकारचे परिवर्तन होण्यास सुरुवात झाली. वाढत्या गुन्हेगारीमुळे गावातील महिला त्रस्त झाल्या होत्या. त्यामुळे हळूहळू या महिला एकत्र येऊ लागल्या. सुरुवातीला त्यांची संख्या कमी होती; पण यांच्या प्रयत्नांनंतर गावात चोरी आणि गुंडगिरीचे प्रमाण कमी होऊ लागल्यानंतर इतर महिलाही त्यांच्याबरोबर एकवटल्या. दोन महिन्यांतच गावाचे चित्र बदलू लागले.
नसता तुरुंगवास भोगावा लागेल
सायंकाळी साडेसातच्या दरम्यान गावात एका घराबाहेर शेकडो महिला हात जोडून उभ्या होत्या. गावात अवैधपणे दारूची विक्री करणा-या एका ज्येष्ठ व्यक्तीच्या घरी या महिला गेल्या होत्या. सर्व महिला त्या व्यक्तीला विनंती करत होत्या. मात्र, तो काहीही ऐकण्यास तयार नव्हता. तेव्हा महिलांनी त्याला सरळ इशारा देऊन टाकला. ‘जर तुम्ही हात जोडून ऐकणार नसाल, तर तुरुंगवास भोगावा लागेल,’ असे म्हणत त्या महिला तेथून निघून गेल्या.