आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Women Power Dipected Through Goddess Durga Worship In Kolkata

कोलकत्यात दुर्गापूजेतील देखाव्यातून ‘नारीशक्ती’चा जागर !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता - पश्चिम बंगालमधील दुर्गापूजेचा उत्सव जगभरात प्रसिद्ध असून यंदा महिला शक्तीवर आधारित देखावे आकर्षणाचे केंद्र ठरणार आहेत. महिला अत्याचार, स्त्री भ्रूणहत्येसारख्या संवेदनशील विषयावरील देखावे सादर करून दुर्गा मंडळांनी आदिशक्तीचा एक प्रकारे जागर केला आहे.


कोलकाता महानगरातील चक्रबेरजा सर्बाेजनिन दुर्गोत्सवाने नारीशक्ती संकल्पनेवर देखावा सादर केला आहे. मंडळाला 68 वर्षांची परंपरा आहे. एक महिला म्हणून मी अतिशय बळकट आहे. चुकीच्या गोष्टीसमोर मी कधीही झुकणार नाही. प्रत्येक महिलेमध्ये आंतरिक शक्ती असते. परंतु खल प्रवृत्तीशी लढण्यासाठी महिलांनी आपली इच्छाशक्ती दाखवली पाहिजे. महिलांना कधी समाजात, कधी घरी किंवा नोकरीच्या ठिकाणी असा संघर्ष करावा लागतो. त्यामुळेच आम्ही हा विषय मांडला आहे, असे मंडळाच्या एका सदस्याने म्हटले आहे. कुमारतुली पार्क येथील मंडळाने बारा ज्योतिर्लिंगांचा देखावा उभा केला आहे. ज्योतिर्लिंग याचा अर्थ शक्ती. अर्थात आदिशक्तीचे रूप आहे. प्रत्येक महिलेत दुर्गामाता असते, असे आयोजकांनी सांगितले. डमडम पार्क येथील तरुण दलाने माता संकल्पनेवर देखावा उभा करून, तर बाँगॉन भागातील मंडळांनी बालविवाहाची समस्या मांडून जागृती घडवण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, महिलांच्या विविध समस्यांना देखाव्यातून स्थान दिल्याबद्दल पश्चिम बंगाल महिला आयोगाच्या अध्यक्षा सुनंदा मुखर्जी यांनी दुर्गा मंडळांचे स्वागत केले आहे.


‘अत्याचारी’ नव्हे महिषासुर
मिठागाराच्या परिसरातील काही दुर्गा मंडळांनी आधुनिक काळातील महिषासुर जगासमोर आणला आहे. समाजात महिलांवरील अत्याचाराच्या घटना घडू लागल्या आहेत. त्यामुळे बलात्कारी व्यक्ती ही माणूस नव्हे तर महिषासुर असते. दुर्गेने महिषासुराचा वध केला होता. तीच आता त्यांना ठार करेल, असा संदेश आयोजकांनी दिला. त्याचबरोबर मंडळ या प्रश्नावर जागृतीही घडवण्याचा प्रयत्न करते.


दिल्लीत महिला सुरक्षेवर आवाज
दिल्लीतील चित्तरंजन पार्क डी ब्लॉकमध्ये अनेक वर्षांपासून दुर्गा उत्सव साजरा केला जातो. यंदा त्याचे 17 वे वर्ष. महिला सुरक्षेच्या संकल्पनेवर देखावा सादर करून त्यावर आवाज उठवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. दिल्लीतील नऊ महिन्यांपूर्वीच्या (16 डिसेंबर) घटनेचे ओरखडे अजूनही नागरिकांच्या मनावर आहेत. म्हणूनच आम्ही ही संकल्पना समोर आणली, असे आयोजक देबज्योती बसुरॉय यांनी सांगितले.