आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दार्जिलिंगच्या ट्रेन सुरक्षेवरून जागतिक पातळीवर चिंता; आंतरराष्ट्रीय संस्थेकडून केंद्राला विचारणा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दार्जिलिंग- दार्जिलिंग-हिमालयन रेल्वे (डीएचआर) जगातील दुसऱ्या क्रमांकाची जागतिक वारसा दर्जा असलेली गाडी सध्या चिंतेचा विषय ठरली आहे. पश्चिम बंगालमधील गाेरखालँडवरून सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या ऐतिहासिक टॉय ट्रेनची सेवा ठप्प झाली आहे. या गाडीची कोणत्याही प्रकारे हानी होऊ नये, अशा शब्दांत वर्ल्ड हेरिटेज सेंटरने चिंता व्यक्त केली आहे.  

हेरिटेज सेंटरने केवळ काळजी व्यक्त केली नाही. या जागतिक संस्थेने केंद्र सरकारला त्यासंबंधीचा पत्रव्यवहार करून मदतदेखील देऊ केली आहे. दोन वेळा पत्र पाठवून टॉय ट्रेनच्या भविष्याची चिंता व्यक्त केली. आंदोलनामुळे आतापर्यंत डीएचआरच्या दोन स्थानकांचे नुकसान झाले आहे. सध्या दार्जिलिंगमध्ये अनिश्चितकालीन बंद सुरू आहे. ही परिस्थिती टॉय ट्रेनचे नुकसान करणारी ठरू शकेल, अशी भीती हेरिटेज सेंटरच्या अध्यक्षा मेश्टिल्ड रॉसलर यांनी व्यक्त केली.  

हेरिटेज संस्थेचे काम समन्वयाचे
जागतिक वारसा स्थळांच्या भवितव्याचा प्रश्न उद््भवला किंवा त्याबाबत काही समस्या निर्माण झाल्यास युनेस्कोअंतर्गत समन्वयाचे काम करण्याची जबाबदारी जागतिक वारसास्थळ केंद्राची आहे. 

१९९९ मध्ये मिळाला दर्जा
दार्जिलिंग हिमालयन रेल्वेची बांधणी १८७९ ते १८८१ दरम्यान झाली. नॅरोगेज मार्गावर ती धावते.  या टॉय ट्रेनला  १९९९ मध्ये जागतिक वारसा स्थळाचा दर्जा देण्यात आला. 

पर्यटकांचे आकर्षण
दार्जिलिंगच्या पर्वतीय भागातून धावणारी टॉय ट्रेन हे पर्यटकांचे आकर्षण आहे. त्याचबरोबर तिचे जागतिक मूल्य खूप अधिक आहे. त्याबाबत आम्हाला चिंता वाटते. यासंदर्भातील मुद्दा पुढील वर्षी वर्ल्ड हेरिटेज समितीच्या ४२ व्या बैठकीदरम्यान उपस्थित केला जाणार आहे, असे रॉसलर यांनी सरकारला पाठवलेल्या ई-मेलमधून म्हटले आहे.      

टॉय ट्रेनचे उत्पन्न घटले  
घायबरी, सोनादा या स्थानकांची आंदोलकांनी तोडफोड केली आहे. त्याशिवाय स्थानकाच्या जुन्या इमारतीवरही हल्ला केला होता. त्यानंतर ही ऐतिहासिक टॉय ट्रेन ठप्प झाली आहे. प्रवाशांची संख्याही कमी झाली. परिणामी उत्पन्न घटले आहे, अशी माहिती ईशान्य रेल्वे विभागाचे जनसंपर्क अधिकारी प्रणव ज्योती शर्मा यांनी दिली. टॉय ट्रेनची सेवा पूर्ववत झाली नाही तर दार्जिलिंगच्या पर्यटन व्यवसायाचे मोठे नुकसान होईल, असे ट्रॅव्हल फेडरेशनचे चेअरमन अनिल पंजाबी यांनी म्हटले आहे.
बातम्या आणखी आहेत...