आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पायानेच लिहिते वही अन् फळ्यावरही!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धनबाद (झारखंड) - जन्मत:च दोन्ही हात नसलेल्या बसंतीला लहानपणी शाळेचे प्रचंड वेड होते. पण शारीरिक अपंगत्वामुळे पालकांना तिला शाळेत पाठवावे वाटत नव्हते. मात्र बसंतीची जिद्द पाहून आई प्रभावती देवीने तिला शाळेत पाठवायला सुरुवात केली. सहा वर्षांच्या बसंतीला शाळेतील इतर मुलांप्रमाणे शिकता येत नव्हते. यावर खचून न जाता तिने हातांची कामे पायाने करायला सुरुवात केली. काही दिवसांतच तिला या गोष्टीचा सराव झाला. तिला पायाने वहीतही लिहिता येऊ लागले. 1993 मध्ये दहावी पास झाल्यानंतर ती ट्युशन घेऊ लागली. 2005 मध्ये ती अर्धवेळ शिक्षिकेचे काम करू लागली. तेव्हापासून शाळेतही पायानेच शिकवू लागली.

फळ्यावर पायाने लिहिण्याचे आव्हान पेलले
बसंती केवळ वहीतच नव्हे, तर शाळेतील फळ्यावरही पायानेच लिहिते. वर्गातील मुलांच्या वह्या तपासणे आणि गृहपाठ देण्याचे कामही ती पायानेच करते. 2005 मध्ये शाळेत रुजू झाल्यानंतर तिने फळ्यावर लिहिणे हे तिच्यासाठी एक आव्हानच होते, पण थोडे कौशल्य वापरून आणि शारीरिक समतोल साधून ती फळ्यावरही सहजपणे लिहू लागली.

बहिणीचे लग्नही लावणार
बसंतीने लग्न न करण्याचा निर्णय घेतला आहे. तीन बहिणींचे लग्न वडिलांनी केले असून लहान बहिणीचे लग्न करण्याची जबाबदारी बसंतीवर आहे. तिच्यासाठी बसंती खूप मेहनत करत आहे.

मारून टाकण्याचा लोकांचा सल्ला
जन्मत:च दोन्ही हात नसलेल्या बसंतीला मारून टाकण्याचा सल्ला लोकांनी तिच्या आईला दिला होता. मात्र, आईने कुणाचेही ऐकले नाही. आपल्या मुलीने तिचे आयुष्य पूर्ण जगावे, अशी आईची इच्छा होती. वडिलांच्या निवृत्तीनंतर आज बसंती त्यांच्या कुटुंबाचा मुख्य आधार बनली आहे.