आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

याकूब मेमनची फाशी टळणार? दोन न्यायाधिशांमध्ये मतभिन्नता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - मुंबईतील 1993 च्या बॉम्बस्फोट प्रकरणी दोषी याकूब मेमनच्या डेथ वॉरंट संबंधीत पिटिशनवर सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीत दोन न्यायाधिशांमध्ये मत भिन्नता असल्यामुळे आता या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे वरिष्ठ पीठ निर्णय घेणार आहे. दरम्यान, याकूबला 30 जुलै रोजी नागपूरच्या तुरुंगात फाशी दिली जाणार होती. त्यावर आता स्थगिती मिळण्याची शक्यता आहे.
आजही सुनावणी
याकूबने सुप्रीम कोर्टात पिटीशन दाखल केली आहे. त्यात म्हटले आहे, की क्युरेटिव्ह पिटिशन प्रलंबित असताना डेथ वॉरंट काढण्यात आले, पण त्याला इतर कायदेशीर अवलंब करायचा की नाही याचे स्पष्टीकरण देण्याची संधीही टाडा न्यायालयाने दिली नाही.या याचिकेवर सुनावणी करत असलेल्या सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधिश दवे आणि न्यायाधिश जोसेफ यांच्यात मतभिन्नता होती. त्यामुळे त्यांनी याचिका वरिष्ठ पीठाकडे वर्ग केली आहे. बुधवारी त्यावर सुनावणी होण्याची शक्यता आहे.

दुसरीकेड याकूबच्या फाशीवर स्थगितीसाठी नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीने देखील पिटीशन दाखल केली आहे. महाराष्ट्र शासनाने याकूबचे डेथ वॉरंट जारी केले आहे. त्यानूसार त्याला 30 जुलै रोजी फाशी दिली जाणार आहे.
फाशी झाली तर नागपूर तुरुंगातच होणार दफन
सुत्रांच्या माहितीनूसार, जर याकूब मेमनला फाशी दिली गेली तर नागपूर मध्यवर्ती कारागृहातच त्याला दफन केले जाईल. मात्र, काही दिवसांपूर्वी माध्यमांमध्ये चर्चा होती, की फाशी नंतर त्याचा मृतदेह त्याच्या कुटुंबियांना सुपुर्द केला जाईल. पण आता मिळालेल्या माहितीनूसार, नागपूर तुरुंग प्रशासन त्याला तुरुंगातच दफन करण्याची तयारी करत आहे. त्याचे कारण असे, की त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.

मुलगी आणि पत्नीला मिळेल परवानगी
एका इंग्रजी दैनिकाने नागपूर तुरुंग अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे, की फाशी नंतर याकूबचा मृतदेह त्याच्या नातेवाईकांना दिला जाणार नाही. मात्र, त्याच्या दफनविधीवेळी त्याची मुलगी जुबैदा आणि पत्नी राहिन यांना उपस्थित राहाण्याची परवानगी देण्यात आली आहे. दुसरीकडे त्याचे वकील अनिल गेडाम म्हणाले, आम्ही सरकारकडे त्याच्या मृतदेहाची मागणी करु. तुरुंग प्रशासनाने त्याच्या दफनविधीसाठी गोल मैदानामध्ये जागा देखील निश्चित केली आहे. मागील शनिवारी महाराष्ट्राच्या कारागृह महासंचालक मीरा बोरवणकर यांनी नागपुर तुरुंगाचा दौरा केला आणि सर्व गोष्टींची जातीने पाहाणी केली होती. मात्र त्यांनी माध्यमांना याबाबत कोणतीही माहिती दिली नाही.