आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Yediyurappa Factor Effecting Karnataka Elections

कर्नाटक निवडणूक- विरोधी पक्ष नेत्याच्या विरोधात येदियुरप्पांचा पीए

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू - भाजप सरकारमध्ये एकाच मंत्रिमंडळात काम केलेले मंत्री येदियुरप्पा फॅक्टरमुळे एकमेकांवर तोंडसुख घेत आहेत. सख्खे भाऊ आरोप-प्रत्यारोपांच्या तलवारी उपसत आहेत. बेल्लारीत खाण व्यावसायिकांची नसलेली छाप आणि भाजपविरोधी लाटेवर स्वार होण्याची मनीषा बाळगून असलेली कॉँग्रेस इच्छुक उमेदवारांच्या भाऊगर्दीत अडकली असल्याचे चित्र सध्या राज्यात आहे. वरुणा मतदारसंघात कॉँग्रेस नेते व विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांच्याविरोधात येदियुरप्पा यांनी त्यांचे स्वीय सहायक सिद्धलिंगस्वामी यांना तिकीट दिले आहे.

5 मे रोजी होणार्‍या विधानसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्षांनी शंभरपेक्षा अधिक ठिकाणचे तिकीट वाटप केले आहे. भाजप सरकारच्या कार्यकाळात पक्षविरोधी काम केल्यामुळे किंवा घोटाळ्यात अडकल्याच्या आरोपामुळे 30 पेक्षा जास्त आमदारांना पक्ष सोडणे भाग पडले. यामुळे भाजपने निवडणुकीपूर्वी आत्मविश्वास गमावल्याचे जाणवते. भाजपला सत्तेवरून खेचण्यासाठी कॉँगे्रसने आघाडी उघडली असली तरी या वेळी उमेदवारी
मिळवण्यासाठी इच्छुकांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याने या पक्षालाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. अलीकडे काही संस्थांनी घेतलेल्या निवडणूक सर्वेक्षणात कॉँग्रेस सत्तेवर येईल, असा दावा केला आहे.

बंगारप्पापुत्र आमने-सामने
गेल्या निवडणुकीत भाजप, कॉँग्रेस व जेडीएस असा तिरंगी सामना होता. या वेळी येदियुरप्पा यांच्या कर्नाटक जनता पार्टीमुळे (कजपा) ही चौरंगी लढत झाली आहे. माजी मुख्यमंत्री एस. बंगारप्पा यांचे पुत्र कुमार बंगारप्पा (कॉँग्रेस) आणि मधू बंगारप्पा (जेडीएस) एकमेकांच्या विरोधात उभे आहेत.

निवडणूक आयोगाची बैठक
10 एप्रिलपासून निवडणूक कार्यक्रमाला प्रत्यक्ष सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर आयोगाचे पथक सोमवारी बंगळुरूला भेट देत आहे. मुख्य निवडणूक आयुक्त व्ही.एस. संपथ यांच्यासह निवडणूक आयुक्त एच.एस. ब्रह्मा, एस.एन.ए. झैदी सोमवारी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांची बैठक घेणार आहेत.