आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योगी आदित्यनाथ यांचा 20 लाख रोजगारनिर्मितीचाही संकल्प; गुंतवणुकीसाठी रोड शो

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ- उत्तर प्रदेशचे ब्रँडिंग करण्याचा विडाच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उचलला आहे. त्यामुळे २०२२ पर्यंत राज्यात २० लाख रोजगारनिर्मिती करणे, ५ लाख कोटींची गुंतवणूक आणण्याचे उद्दिष्ट त्यांनी ठेवले आहे.  


उत्तर प्रदेशात गुंतवणूक वाढवण्यासाठी इतर राज्यांत मोठ्या प्रमाणात रोडशो तसेच इतर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी आराखडा तयार केला जाणार आहे. त्याचबरोबर राज्याच्या राजधानीत गुंतवणूकदारांसाठी संमेलनाचेदेखील आयोजन केले जाणार आहेे. राज्यात किमान ५ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीला संधी आहे. अनेक क्षेत्रांत अशा प्रकारची संधी उपलब्ध करून देतानाच विविध प्रकारच्या सवलती देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, अशी माहिती राज्याच्या पायाभूत तथा आैद्योगिक विकास आयुक्त अनुपचंद्र पांडे यांनी दिली.  


फेब्रुवारीत पहिले संमेलन;  मुंबईत २२ डिसेंबरला रोड शो

योगी सरकारने उद्योजकांना आकर्षित करण्यासाठी पुढील वर्षी २१ व २२ फेब्रुवारी रोजी संमेलनाचे आयोजन केले आहे. त्याशिवाय या वर्षी ८ डिसेंबर रोजी नवी दिल्लीत रोड शो होईल. बंगळुरू, अहमदाबाद, मुंबई, कोलकाता येथे देखील रोड शो होणार आहेत. मुंबईत तो २२ डिसेंबरला होईल. मुख्यमंत्री आदित्यनाथ या रोड शोला उपस्थित राहणार आहेत.

 

२६ अमेरिकन कंपन्या उत्सुक 

उत्तर प्रदेशात गुंतवणूक करण्यासाठी अमेरिकेतील २६ कंपन्या उत्सुक आहेत. त्यांच्याशी यापूर्वीच बोलणी झाली आहे. त्याशिवाय इतरही देशातून गुंतवणुकीसाठी विचारणा होत आहे. त्यामुळे प्रयत्न यशस्वी होईल, असा विश्वास योगी सरकारला वाटतो.     

बातम्या आणखी आहेत...