आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झुबिन मेहता यांच्या संगीत स्वरांनी काश्मीर मंत्रमुग्ध; धमक्यानंतरही झाला कार्यक्रम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीनगर- फुटीरवादी गट आणि दहशतवादी संघटनांच्या धमक्यांना न जुमानता प्रसिद्ध संगीतकार झुबिन मेहता यांनी शनिवारी जम्मू काश्मीरमध्ये कार्यक्रम सादर केला. जबरवां टेकडीच्या पायथ्याशी दल सरोवराच्या तटावर पार पडलेल्या या संगीत कार्यक्रमाने काश्मीरवासी मंत्रमुग्ध झाले. जर्मन दूतावासाने हा कार्यक्रम आयोजित केला होता. दरम्यान, हा कार्यक्रम हाणून पाडण्यासाठी आलेल्या चौघांना पोलिसांनी अटक केली.

400 वर्षे जुने असलेल्या मुघल गार्डनमध्ये मेहता आणि त्यांच्या बव्हेरियन स्टेट ऑर्केस्टाने दीड हजार निमंत्रित पाहुण्यांसमोर लुडविग वान बिथोवन, फ्रांज जोसेफ हेडन, प्योत्र इलिइच त्वायकोवस्की रचना सादर केल्या. कार्यक्रमाची सुरुवात काश्मिरी संगीतकार अभय रुस्तम सोपोरी यांच्या रचनेने करण्यात आली. त्यापूर्वी झुबिन मेहता यांनी मनोगत व्यक्त केले, ते म्हणाले की, येथे येऊन मी खूप आनंदी असून या क्षणाची मी कित्येक वर्षांपासून वाट पाहत होतो. ज्या लोकांचे संगीत मी यापूर्वी नकळतपणे ऐकले असेल ते लोक कोठे आहेत. पुढील वेळी हे कार्यक्रम नि:शुल्क व्हायला हवे कारण संगीत सर्वांसाठीच खुले असावे.

कार्यक्रमाविरोधात काश्मीर बंद
झुबिन मेहता यांच्या संगीत कार्यक्रमामुळे काश्मीरमध्ये राजकीय वाद सुरू झाले होते. फुटीरवादी गट आणि नागरी संस्था कार्यक्रमाच्या विरोधात होत्या. त्यांच्या मते काश्मीरमधील शांततेची प्रतिमा जगासमोर आणण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. दरम्यान, कार्यक्रमावेळी शहरात कडकडीत बंद होते. फुटीरवादी नेता सय्यद अली शाह गिलानी यांनी या बंदचे आहवान केले होते. या वेळी जम्मू काश्मीर कोलिशन ऑफ सिव्हिल सोसायटीने या कार्यक्रमावेळीच ‘हकीकत ए कश्मीर’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते परंतु सुरक्षा दलाने तो कार्यक्रम होऊ दिला नाही.

काश्मिरात दहशतवादी हल्ला, 3 जण ठार
जम्मू-काश्मीरमध्ये शनिवारी दहशतवाद्यांनी केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या तळावर हल्ला केला. त्यात तीन जण ठार झाले. शोपियान जिल्ह्यातील सुरक्षा तळावर दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. ही घटना शोपियानपासून 52 किलोमीटर अंतरावरील गागरानमध्ये घडली. घटनास्थळाहून तीन शस्त्रे जप्त करण्यात आली, अशी माहिती पोलिस महासंचालक ए.जी.मीर यांनी दिली.