आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • French President Hollande To Begin 3 day India Visit

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष ओलांद भारत भेटीवर, आज चंदिगडमध्ये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदिगड - फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रान्सवा ओलांद भारत भेटीवर येणार असून त्यांच्या तीनदिवसीय दौऱ्याची सुरुवात रविवारपासून चंदिगड दौऱ्याने होणार आहे. त्यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील असतील.
ओलांद यांचे रविवारी दुपारी १ च्या सुमारास चंदिगडमध्ये आगमन होईल. त्यांच्यासमवेत उच्चस्तरीय शिष्टमंडळही असेल. रॉक गार्डन, सरकारी संग्रहालय आणि कला दालनाला उभय नेते भेट देतील. राष्ट्रप्रमुख दौऱ्यावर असले तरी चंदिगडमधील वाहतुकीला अडथळा येणार नाही, याची खबरदारी घेण्यात आली आहे. जेणेकरून सामान्य नागरिकांना त्यामुळे वैताग होणार नाही. उभय नेते किमान १५ मिनिटे सोबत असतील. सायंकाळी ते दिल्लीला रवाना होतील. दरम्यान, भारत आणि फ्रेंच यांच्यात दहशतवादाच्या विरोधात परस्परांना सहकार्य वाढवण्यासंबंधीचा करार होण्याची शक्यता आहे.

पॅरिस आणि पठाणकोट हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर उभय देशांतील चर्चेला महत्त्व आहे. दरम्यान, गेल्या वर्षी फ्रान्सने चंदिगड, नागपूर आणि पुडुचेरी या तीन शहरांच्या विकासासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले होते. दुसरीकडे चंदिगडचा देशातील अव्वल २० शहरांत समावेश करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
प्रजासत्ताक दिनाचे पाहुणे
फ्रान्सवा ओलांद यांचा भारत दौरा द्विपक्षीय संबंधाला बळकटी देणार आहे. त्याचबरोबर यंदाच्या प्रजासत्ताक दिनी ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. फ्रेंच लष्कर तसेच बँड देखील राजपथावरील पथसंचलनाचे आकर्षण ठरेल. प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी भारतात येणारे ते पाचवे फ्रेंच नेते ठरले आहेत. यापूर्वी १९७६, १९८०, १९९८, २००८ मध्ये फ्रेंच नेते पाहुणे म्हणून सहभागी झाले होते.