आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जैन धर्माचे संथारा गुन्हा, हजारो वर्षांची प्रथा राजस्थान न्यायालयाने ठरवली आत्महत्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संथारा प्रथेचा प्रतिकात्मक फोटो - Divya Marathi
संथारा प्रथेचा प्रतिकात्मक फोटो
जयपूर- जैन धर्मातील मृत्यूला जवळ करण्याच्या हजारो वर्षे जुन्या संथारा प्रथेवर राजस्थान उच्च न्यायालयाने सोमवारी बंदी घातली. अन्नपाणी बंद करून प्राण त्यागणे ही आत्महत्याच आहे. असे करणारांविरुद्ध भादंविच्या ३०९ कलमान्वये आत्महत्येचा गुन्हा आणि संथारासाठी प्रवृत्त करणारांविरुद्धही कलम ३०६ अन्वये कारवाई होईल, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
या निर्णयामुळे जैन धर्मगुरू संतप्त झाले आहेत. न्यायालयाने ही प्रथा समजून घेण्यात चूक केली आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. प्रकरण नऊ वर्षांपूर्वी न्यायालयात गेले होते. निखिल सोनी या वकिलाने २००६ मध्ये संथारावर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली होती. ज्याप्रमाणे सतीप्रथा आत्महत्या आहे, त्याचप्रमाणे संथाराही आत्महत्येचाच एक प्रकार आहे, असे त्यांचे म्हणणे होते. राजस्थान उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती सुनील अंबवानी आणि न्यायमूर्ती अजित सिंह यांच्या न्यायपीठाने हा निर्णय दिला. त्यामुळे सती प्रथेप्रमाणेच संथाराही गुन्ह्याच्या श्रेणीत आले आहे.

सर्वांत ‘गुलाम’ निकाल
उद्या दिगंबर मुद्रेवरही बंदी घातली जाईल. आम्ही न्यायालयाचा आदर करतो; पण तेथे बसलेल्या लोकांनी विचार करायला हवा होता. सती व संथारा एक मानणेे चूक आहे. संथाराची प्रक्रिया १२ वर्षे चालते. विनोबा भावेंनीही संथारा घेतले होते. मला गीतेनुसार जीवन व महावीरांसारखा मृत्यू हवा आहे, असे ते म्हणाले होते. काेर्टाने संथाराला आत्महत्या समजून चूक केली. हा स्वतंत्र भारतातील सर्वात गुलाम निकाल आहे, असे दिगंबर जैन मुनी तरुण सागरजी म्हणाले.

धर्मात कोर्टाचा हस्तक्षेप
हा धार्मिक बाबींमध्ये न्यायालयाचा हस्तक्षेप आहे. त्यामुळे जैन समाजाला धक्का बसला आहे. महावीरांनी संथाराची अनुमती दिली होती. एखाद्याला मरणापासून कोणी वाचवू शकले का?
- ऋषभविजय महाराज, श्वेतांबर मुनी, मोहनखेडा आश्रम