Home | National | Uttar Pradesh | Anurag Tiwari was going to scam thousands of crores of rupees in Karnataka!

‘कर्नाटकमधील हजारो कोटींचा घोटाळा अनुराग तिवारी करणार होते उघड!’

वृत्तसंस्था | Update - May 19, 2017, 02:21 AM IST

रहस्यमय स्थितीत येथे मृतावस्थेत आढळलेले कर्नाटक केडरचे आयएएस अधिकारी अनुराग तिवारी हे कर्नाटकमधील काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारचा हजारो कोटी रुपयांचा घोटाळा उघड करणार होते, असा गौप्यस्फोट उत्तर प्रदेशचे विधिमंडळ कामकाजमंत्री सुरेशकुमार खन्ना यांनी गुरुवारी राज्य विधानसभेत केला.

 • Anurag Tiwari was going to scam thousands of crores of rupees in Karnataka!
  लखनऊ : रहस्यमय स्थितीत येथे मृतावस्थेत आढळलेले कर्नाटक केडरचे आयएएस अधिकारी अनुराग तिवारी हे कर्नाटकमधील काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारचा हजारो कोटी रुपयांचा घोटाळा उघड करणार होते, असा गौप्यस्फोट उत्तर प्रदेशचे विधिमंडळ कामकाजमंत्री सुरेशकुमार खन्ना यांनी गुरुवारी राज्य विधानसभेत केला. तिवारी यांची हत्या करण्यात आली, असा आरोप विरोधी बाकांवरून झाल्यानंतर खन्ना यांनी ही माहिती दिली.

  खन्ना म्हणाले की, कर्नाटक केडरचे आयएएस अधिकारी असलेले अनुराग तिवारी यांचा मृतदेह बुधवारी रस्त्याच्या कडेला आढळला, हे खरे आहे. चार डॉक्टरांच्या पॅनेलने शवविच्छेदन तपासणी केली होती. त्यांच्या मृत्यूचे निश्चित कारण समजू शकले नाही. त्यामुळे त्यांचा व्हिसेरा जपून ठेवण्यात आला आहे.
  विधानसभेची बैठक सुरू होताच विरोधी सदस्यांनी सत्ताधारी भाजपला कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. समाजवादी पक्षाचे नितीन अगरवाल यांनी प्रश्नोत्तरांच्या तासात हा मुद्दा उपस्थित केला. “अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्था असलेल्या हजरतगंज भागात अनुराग तिवारी यांचा खून करण्यात आला. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून सरकारच्या मोठमोठ्या दाव्यांची पोल उघडली गेली आहे”, असा आरोप त्यांनी केला.

  हा मुद्दा उपस्थित करण्यासाठी समाजवादी पक्षाच्या अनेक सदस्यांनी सभागृहाच्या हौद्यात धाव घेतली होती. मात्र, हे प्रकरण प्रश्नोत्तरांच्या तासात उपस्थित केले जाऊ शकत नाही, असे सांगत विधानसभेचे अध्यक्ष हृदय नारायण दीक्षित यांनी सदस्यांना आपापल्या जागांवर परत जाण्याची सूचना केली.

  विरोधी पक्षाचे नेते रामगोविंद चौधरी म्हणाले की, व्हीआयपी भागात आयएएस अधिकाऱ्याचा खून होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते अजय प्रताप लल्लू यांनीही हा मुद्दा उपस्थित केला आणि या घटनेची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी केली. चौकशी सुरू आहे, असे आश्वासन खन्ना यांनी सभागृहाला दिले. मात्र, उत्तराने समाधान न झाल्याने समाजवादी पक्ष, काँग्रेस आणि बसपच्या सदस्यांनी सभात्याग केला.

  तिवारींच्या हत्येची होणार एसआयटी चौकशी
  अनुराग तिवारींच्या मृत्यूच्या चौकशीसाठी गुरुवारी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले आहे. विशेष पोलिस अधीक्षक दीपककुमार यांनी सांगितले की, या पाच सदस्यांच्या पथकाला ७२ तासांत तपास अहवाल देण्यास सांगितले आहे. तत्पूर्वी अनुराग यांचे मोठे भाऊ आलोक आणि मयंक यांनी अनुराग यांची हत्या झाल्याचा आरोप केला. ‘अनुराग यांनी कर्नाटकमध्ये अनेक घोटाळे उघड केले होते, त्यामुळे अनेक अधिकारी आणि नेते त्यांच्यामागे होते,’ असे त्यांचे म्हणणे आहे. भावाची हत्या झाल्याची भीती व्यक्त करत त्यांनी एखाद्या नि:पक्ष संस्थेमार्फत या घटनेच्या चौकशीची मागणी केली आहे. दुसरीकडे एसएसपी दीपककुमार म्हणाले की, सध्या तरी अनुराग यांच्या नातेवाइकांकडून पोलिसांकडे अधिकृतपणे कोणतीही तक्रार नोंदवण्यात आलेली नाही.

Trending