मेरठ (उत्तर प्रदेश)- भारतविरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामना सुरू असताना आणि सामना संपल्यावर पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा दिल्याने 67 काश्मिरी विद्यार्थ्यांविरुद्ध राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, जम्मू आणि काश्मिरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी काश्मिरी विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या कारवाईवर नाराजी व्यक्त केली आहे.
स्वामी विवेकानंद सुभारती विद्यापिठातील विद्यार्थी भारतविरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामना विद्यापिठाच्या आवारात बघत होते. यावेळी काश्मिरी विद्यार्थ्यी पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा देत होते. हा सामना पाकिस्तानने जिंकल्यानंतर काश्मिरी विद्यार्थ्यांनी जल्लोष केला. यावर इतर विद्यार्थ्यांनी आक्षेप नोंदविला. त्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड हाणामारी सुरू झाली. घडलेल्या प्रकारानंतर विद्यापिठाचे कुलगुरू मंजुर अहमद यांनी 67 काश्मिरी विद्यार्थ्यांना विद्यापिठातून निलंबित केले. या विद्यार्थ्यांविरुद्ध राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्यापिठाच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, जम्मू काश्मिरच्या विधानसभेत विरोधी पक्षांनी हा मुद्दा उपस्थित केला. यावेळी पिपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या सदस्यांनी काश्मिरी विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला तर भारतीय जनता पार्टी आणि जम्मू काश्मिर नॅशनल पॅंथर्स पार्टीने सभागृहात वॉक आऊट करणे पसंत केले.