नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राइकवर रविवारी पहिल्यांदाच भूमिका मांडली. ते पाकिस्तानचे नाव न घेता म्हणाले, शक्तीवान होण्याचा अर्थ कोणाविरुद्ध असणे नव्हे. आम्ही बळ वाढवण्यासाठी व्यायाम करतो तेव्हा आपणच लक्ष्य आहोत असा विचार शेजाऱ्याने करण्याची गरज नाही. मी स्वत:साठी आणि माझ्या अारोग्यासाठी व्यायाम करतो.
पंतप्रधान मोदी येथे दीनदयाळ उपाध्याय यांच्या १०० व्या जयंती कार्यक्रमात बोलत होते. ‘द कम्प्लीट वर्क्स ऑफ दीनदयाल उपाध्याय’ या १५ खंडांच्या पुस्तकाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते झाले. देशाचे लष्कर अत्यंत सामर्थ्यवान असायला हवे. लष्कर शक्तिशाली असते तेव्हा राष्ट्र शक्तिशाली बनते.
देश सामर्थ्यवान व बळकट व्हावा ही गरज आहे, असे मोदींनी सांगितले. यावर्षीची विजयादशमीही अापल्यासाठी खास असल्याचे ते म्हणाले. सर्जिकल स्ट्राइकवर यापूर्वी माेदींनी जाहीर भाष्य केले नव्हते. यावरुन देशभर वाद पेटलेला असतानाही ते गप्पच हाेते.