आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपी प्रजापती यास जामीन देणारे न्यायमूर्ती निलंबित

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ- सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपी समाजवादी पक्षाचे नेते व माजी मंत्री गायत्री प्रजापती यास जामीन मंजूर करणारे  न्या. आेमप्रकाश मिश्रा यांना निलंबित करण्यात आले आहे. ते उद्या रविवार, ३० एप्रिल रोजी सेवानिवृत्त होणार होते. प्रजापतीच्या जामीन अर्जास उत्तर प्रदेश सरकारने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.  

उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दिलीप बी. भाेसले यांनी दिलेल्या आदेशात म्हटले : ‘गुन्ह्याच्या गंभीर स्वरूपाकडे दुर्लक्ष करत न्यायाधीशांनी ज्या प्रकारे घाई दाखवली त्यामुळे त्यांच्या हेतूविषयी शंका घेतली जाऊ शकते.’ लखनऊच्या स्थानिक न्यायालयाने प्रजापतीचा जामीन मंजूर केला होता. त्यास शुक्रवारी उच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती.   पीडितेने २०१४ ते २०१६ दरम्यान बलात्कार झाल्याची फिर्याद दिली नव्हती. त्यामुळे तिची तक्रार संशयास्पद वाटते, असा निर्वाळा न्या. मिश्रा यांनी जामीन मंजूर करताना दिला होता.  

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, उत्तर प्रदेशातील चित्रकूट येथील महिलेने थेट मुलायमसिंग यादव यांचे निकटवर्तीय आणि माजी मंत्री गायत्री प्रजापती याच्यावर ऑक्टोबर २०१४ ते जुलै २०१६ दरम्यान सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप केला. 

तसेच प्रजापतीने जेव्हा तिच्या अल्पवयीन मुलीशीही कुकर्म केले तेव्हा त्या महिलेने पोलिस महासंचालकांना पत्र लिहून प्रजापतीविरोधात तक्रार दिली होती. या प्रकरणात प्रजापतीशिवाय अन्य सहा लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुमारे एक महिना गायत्री प्रजापती एेन निवडणूक काळात फरार होता. त्यामुळे वादळ उठले होते. त्यानंतर १५ मार्च रोजी त्यास अटक करण्यात आली होती.  

सत्तापालट होताच प्रजापती पोलिसांच्या जाळ्यात  
 उत्तर प्रदेशात अखिलेश यादव यांचे सरकार सत्तेवरून पायउतार हाेताच सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपी माजी मंत्री व समाजवादी पार्टीचे  नेते गायत्री प्रजापती  यास अटक करण्यात आली. प्रजापती हे बडे प्रस्थ होते. बलात्काराचा अाराेप होऊनही ते मंत्रिमंडळात कायम होेते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. तेव्हा २७ फेब्रुवारीपासूनच ते फरार झाले.  तत्कालीन मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या बंगल्यात ते लपून बसल्याचा विरोधकांचा आरोप होता.  पोलिस प्रजापतीचा शोध घेत होते, पण तो काही हाती लागत नव्हता. त्यास येत्या २४ तासांत अटक करण्यात येईल, असे आश्वासन वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिले होते. उत्तर प्रदेशातील डीआयजी जावेद अहमद यांनी तेव्हा सांगितले होते की, प्रजापती वारंवार आपले ठिकाण बदलतो आहे. दरम्यान हरियाणा-दिल्ली सीमेवर तो लपून बसला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. तब्बल १७ दिवसांनी प्रजापतीस पोलिसांनी (१५ मार्च रोजी )अटक केली. प्रजापतीला लखनऊतील आशियाना भागात पकडण्यात आले. 
 
 
बातम्या आणखी आहेत...