आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस यूपी विधानसभा निवडणूक स्वबळावरच लढणार : राज बब्बर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ : मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसशी युती करण्याची कल्पना मांडली असली तरी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राज बब्बर यांनी मात्र आपला पक्ष राज्यात स्वतंत्रपणे निवडणूक लढवेल, असे सोमवारी स्पष्ट केले. सपा-काँग्रेस युतीची चर्चा ‘काल्पनिक’ आहे, अशी टिप्पणी त्यांनी केली.

वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत राज बब्बर म्हणाले की, युतीच्या चर्चेमुळे कार्यकर्त्यांचे मनोधैर्य कमी होते. मला तरी युतीबद्दल माहिती नाही. पक्ष नेतृत्वाने मला युती करण्यास सांगितले नाही. त्यावर विचारही सुरू नाही. हे सर्व काल्पनिक आहे.

आपला पक्ष स्वबळावर बहुमत मिळवण्यास सक्षम आहे, पण काँग्रेसशी युती झाली तर एकत्रितपणे ३०० वर जागा जिंकू, असे वक्तव्य अखिलेश यादव यांनी केले होते. त्यामुळे दोन्ही पक्षांत निवडणूकपूर्व युती होणार, अशी चर्चा सुरू झाली होती.
मात्र, युतीबाबतचा अंतिम निर्णय पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव हेच घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. बब्बर यांनी सांगितले की, काँग्रेस उत्तर प्रदेशमध्ये स्वतंत्रपणे निवडणूक लढवेल. उमेदवार निवडीची प्रक्रिया सुरू झाली आहे. आम्ही जिल्हाध्यक्षांकडून संभाव्य उमेदवारांची नावे मागवली आहेत.
उमेदवारांची पहिली यादी या महिन्याच्या अखेरीस जाहीर होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीत पक्षाची संभाव्य कामगिरी कशी राहील, या प्रश्नावर बब्बर म्हणाले की, राज्यात परिस्थिती बदलत आहे. जे लोक काँग्रेसला शून्य समजत होते ते आता आमच्याबद्दल बोलत आहेत. गेल्या काही महिन्यांत काढलेल्या यात्रांमुळे लोकांशी जोडले जाण्यात आम्हाला यश मिळाले आहे.

नोटाबंदीचा भाजपला फटका बसेल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘कॅशलेस सोसायटी’ संकल्पनेवर टीका करताना बब्बर म्हणाले की, आपल्या देशातील ९० टक्के लोक असंघटित आहेत. ते प्लास्टिक नाहीत, तर भावनिक आहेत. भावनेमुळे ते एकमेकांना मदत करतात. नोटाबंदीमुळे सामान्य लोकांची अडचण झाली आहे. त्याचा फटका भाजपला बसेल.
बातम्या आणखी आहेत...