आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यूपीत विरोधकांच्या गोंधळाने सुरूवातीलाच राज्यपाल सभागृहातून बाहेर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - उत्तर प्रदेशमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीस बुधवारी राज्यपाल राम नाईक यांना विरोधकांच्या गोंधळाला सामोरे जावे लागले. बहुजन समाज पक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रीय लोकदलाच्या आमदारांनी नाईक व मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. वाढत्या गोंधळात अभिभाषण पूर्ण करणे शक्य न झाल्याने नाईक यांनी पहिली व शेवटची ओळ वाचून पाच मिनिटांत सभागृहातून बाहेर पडणे पसंत केले. या वेळी भाजप आमदार गैरहजर होते.
नाईक भाषण वाचण्यासाठी पोडियमजवळ येताच विरोधी आमदारांनी राज्यपालांना माघारी बोलवा व मुख्यमंत्र्यांना बडतर्फ करण्याच्या घोषणा दिल्या. राज्यपालांनी शांत राहण्याची विनंती केली, मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. अखेर त्यांनी भाषणाची पहिली आणि शेवटची ओळ वाचून पाच मिनिटांत सभागृह सोडले. संविधानविरोधी राज्यपाल वापस जावो, न्यायपालिकाविरोधी राज्यपाल वापस जावो, विकासविरोधी एसपी सरकार बर्खास्त करो आदी पोस्टर्स घेऊन विरोधक घोषणा देत होते. याशिवाय अवैध खाणकाम, गुंडगिरी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांची पोस्टर्स होती. महिनाभराच्या अधिवेशनात मुख्यमंत्री अखिलेश यादव २४ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर करतील.

आझम यांचा विरोध; भाजपचा बहिष्कार
आझम खान यांनी राज्यपाल नाईक यांच्याविरोधात वारंवार केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ भाजपने आजच्या कामकाजात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला होता. यादव सरकार राज्यपालांचा आदर राखण्यात अपयशी ठरल्याचा आरोप भाजपने केला आहे. खान यांनी राज्यपालांना लिहिलेल्या चारपानी पत्राची माहिती यादव यांना दिली. आता मात्र घटनात्मक बंधनामुळे त्यांना सरकारची उपलब्धी वाचावी लागत आहे. सभागृहात अनुपस्थित राहून लाेकांचे या मुद्द्याकडे लक्ष वेधण्याचा आम्ही प्रयत्न केल्याचे भाजपच्या विधिमंडळ पक्षाचे नेते सुरेश खन्ना यांनी सांगितले.

कारसेवकाप्रमाणे वागतात : आझम
आझम खान यांनी अलीकडे केलेल्या आरोपात म्हटले की, बाबरी मशीद पाडणाऱ्या कारसेवकांप्रमाणे राज्यपालांची वर्तणूक आहे. त्याआधीही त्यांनी दोन वेळेस असेच वक्तव्य केल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष लक्ष्मीकांत बाजपेयी यांनी केला आहे. राज्यपाल विद्यापीठांचे कुलपती आहेत. त्यांनी काही विद्यापीठांबाबत माहिती मागवल्यामुळे हा राजकीय दबाव निर्माण करण्याचा प्रकार असल्याचा आरोप त्यांनी केला.
गोंधळामुळे विधान परिषद आजपर्यंत स्थगित
बसपा, काँग्रेससह विरोधी आमदारांच्या गोंधळामुळे विधान परिषदेचे कामकाज गुरुवारपर्यंत स्थगित करण्यात आले. १२.३० वाजता सभागृहाच्या कामकाजास सुरुवात होताच विरोधकांनी राज्यपालांविरोधात घोषणाबाजी केली. राज्यपाल सरकारचा दस्तऐवज वाचणार असल्यामुळे त्यांच्या भाषणाला अर्थ नाही, असा आरोप विरोधी पक्षनेते नसीमुद्दीन सिद्दिकी यांनी केला. अध्यक्ष गणेश शंकर यांनी राज्यपालांच्या अभिभाषणाची घोषणा केल्यानंतर विरोधक घाेषणा देत अध्यक्षांसमोरील हौद्यात उतरले.