आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नवी दिल्ली - आंदोलने असो की निदर्शने. गर्दी आणि पोलिस यांचा संबंध येतोच. अशा वेळी गर्दीला हाताळताना होणारी ‘हातघाई’ हा वर्षानुवर्षांचा संतापजनक शिरस्ता. त्याला टाळण्यासाठी आता सरकारने या विषयाचा अभ्यास करण्याचे ठरवले आहे. यातून पोलिसांचा दंडुकाही नियंत्रणाखाली येईल, असे सरकारला वाटते.
गर्दीवर पोलिसांची लाठी पडल्यानंतर अनेक घटनांत निष्पाप नागरिकांना आपले प्राणही गमवावे लागले आहेत. देशातील अनेक राज्यांत अशा घटना घडल्या आहेत. त्यासाठी ब्युरो ऑफ पोलिस रिसर्च अँड डेव्हलपमेंट (बीपीआरडी) विभागाने अशा प्रकारच्या अभ्यासाची जबाबदारी गुडगाव येथील एका खासगी संस्थेकडे दिली आहे. केंद्रीय गृह खात्याने त्याला हिरवा कंदील दाखवला आहे. विविध राज्यांतील घटनांचा अभ्यास करून त्याचा अहवाल ही संस्था ऑक्टोबरमध्ये दाखल करेल. त्यानंतर बीपीआरडी गृह खात्याकडे सादर करेल. पोलिसांनी गर्दीला हाताळताना कमीत कमी बळाचा वापर करावा. त्यामुळे नुकसान टळेल, गर्दी हाताळताना हिंसाचार किंवा तत्सम वाईट घटना घडू नयेत, म्हणून इजा न पोहोचणारे अस्त्र विकसित करण्याचे ध्येय विभागाने ठेवले आहे. विविध राज्यांत अशा परिस्थितीत पोलिस दलाने केलेल्या कारवाईचा अभ्यास केल्यानंतर प्रोटोकॉल तयार करण्यात येतील. बीपीआरडीच्या संशोधन विभागात संरक्षण व विकास संघटनेचे अधिकारी, अश्रुधूर विभागाचे अधिकारी यांचाही समावेश आहे.
‘बीपीआरडी’चे स्वरूप - पोलिस व सुरक्षा दल यांच्या कार्यपद्धतीवर नियंत्रण ठेवण्याचे काम करणारा बीपीआरडी हा स्वतंत्र विभाग आहे. गृह खाते व पोलिस यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून या विभागाकडे पाहिले जाते. या विभागाच्या नियंत्रणामुळे पोलिस व सुरक्षा यंत्रणेच्या कामाचे तटस्थपणे मूल्यमापन करता येणे शक्य आहे.
मानसिकतेचे स्कॅनिंग - विविध राज्यांतील पोलिस दलाच्या कारवाईतून देशभरातील पोलिसांच्या मानसिकतेचाही अभ्यास यातून होणार आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या उद्देशाने एकत्र येणा-या गर्दीला पोलिस कशा प्रकारे हाताळतात याचेही मूल्यमापन होणार आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.