Home »National »Other State» Aadhar Card Download

‘आधार’कार्ड करा डाऊनलोड

दिव्य मराठी नेटवर्क | Jan 08, 2012, 01:25 AM IST

  • ‘आधार’कार्ड करा डाऊनलोड

रांची - प्रत्येक भारतीय नागरिकाला आपली स्वतंत्र ओळख देणारे ‘आधार’ कार्ड आता इंटरनेटवरून अधिकृतपणे डाऊनलोड करता येणार आहे. ही कार्डे पोस्टाने पाठवण्यात होत असलेला विलंब पाहता सोमवारपासून ही व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती यूनिक आयडेंटिफिकेशन अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियाचे महासंचालक आर. एस. शर्मा यांनी दिली आहे. ते रांची येथे पत्रकारांशी बोलत होते.
शर्मा यांनी सांगितले की, आधार कार्डासाठी नावनोंदणी करणा-यांना नंतर पोस्टानेही आधार कार्ड पाठवण्यात येईल. तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेची (मनरेगा) मजुरी आणि सामाजिक सुरक्षा निधीही मायक्रो एटीएमच्या माध्यमातून दिला जाणार असल्याची माहितीही शर्मा यांनी दिली. यासंबंधीचा पायलट प्रोजेक्ट झारखंडमधील काही भागांत सुरू करण्यात आला आहे.
मायक्रो एटीएम : हे एक छोटे यंत्र असून, मोबाइल चिपद्वारे काम करते. हे यंत्र आधार क्रमांकाशी जोडलेले असते. दुर्गम भागातील कुणालाही आपली मजुरी घ्यायची असेल तर या यंत्रावरील विशिष्ट जागेवर त्याला अंगठा टेकवावा लागतो. त्याची ओळख पटताच मायक्रो एटीएम चालवणा-या व्यक्तीमार्फत त्या मजुरास वेतन दिले जाते. झारखंडच्या वेगवेगळ्या भागांत वेगवेगळ्या बँकांनी ही जबाबदारी स्वीकारली आहे.
स्थायी समितीच्या अहवालामुळे अडचण नाही :लोकसभेच्या स्थायी समितीच्या अहवालामुळे आधार क्रमांक देण्याच्या प्रक्रियेत काहीही अडचण येणार नाही. याबाबत अ‍ॅटर्नी जनरल यांचा सल्ला घेण्यात आला आहे. नवा कायदा तयार होईपर्यंत यूआयडीएआय आपले काम करीत राहील. नव्या कायद्यानंतर याचा परीघ विस्तारेल. आधारसाठी गोळा केलेली माहिती कुणी पळवू नये म्हणून सुरक्षिततेकडे गांभीर्याने लक्ष दिले जात आहे, असेही शर्मा यांनी सांगितले.
आधार कार्ड कसे डाऊनलोड करावे - आधार कार्डासाठी नावनोंदणी केलेल्या नागरिकाने ‘ईआधार डॉट यूआयडीए डॉट जीओव्ही डॉट इन’ या संकेतस्थळावर लॉग इन करून आपले नाव, एन्रोलमेंट नंबर आणि पिनकोड टाकावा. त्यानंतर पीडीएफ फॉर्ममध्ये आधार कार्ड दिसेल आणि ते डाऊनलोड करता येईल.

Next Article

Recommended