आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • After The Rahul Gandhi Meeting Drama Contiune In Party ; Various States Have Same Problem

राहुल गांधींच्या बैठकांनंतरही पक्षांतर्गत गटबाजी सुरूच ;विविध राज्यांमधील परिस्थिती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - काँग्रेस पक्षाचे बडे नेते, प्रदेशाध्यक्ष व अन्य नेत्यांसोबत थेट सुसंवाद कायम करण्यासाठी पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी महाराष्‍ट्रासह विविध राज्यांचे दौरे पूर्ण केले आहेत, परंतु त्यांचा हा दौरा पक्षांतर्गत गटबाजी संपुष्टात आणू शकलेला नाही. यामुळे पक्षपातळीवर खुल्या चर्चेचे व्यासपीठ उपलब्ध झाल्यानंतर नेत्यांनी त्याचा उपयोग एकमेकांवर इतर नेत्यांबाबत मनातील रोष, आरोप- प्रत्यारोप करण्यासाठीच करत असल्याचे चित्र आहे. अनेक ठिकाणी गटबाजी व नाराजी पहिल्यापेक्षा जास्त उफाळून आल्याचेही दिसून आले.

पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, दिल्ली आदी राज्यांत गटबाजी सुरू असून प्रस्थापित नेत्यांविरोधात तक्रारी प्राप्त होत आहेत. पंजाबमध्ये गटबाजी वाढल्याने माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांना प्रदेशाध्यक्षपदावरून हटवण्याचा निर्णय काँग्रेसला घ्यावा लागला आहे.

पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, केंद्रीय पातळीवर संभ्रमाचे वातावरण कायम आहे. पक्षाचे प्रभारी व बड्या नेत्यांवर स्थानिक नेत्यांकडून आरोप केले जात आहेत. पक्षाच्या सर्व बड्या नेत्यांना राहुल गांधींच्या भूमिकेचा नेमका अंदाज अद्याप आलेला नाही. पक्षात बंडखोरी खपवून घेतली जाणार नाही, संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा राहुल यांनी पदाधिका-यांना दिला आहे. मुंबईतही त्यांनी महाराष्‍ट्रातील नेत्यांना तशा प्रकारचा सज्जड दम भरला होता. अर्थात असे असले तरीही पक्षातील जुन्या नेत्यांना एकदम बाजूला टाकण्याच्या मूडमध्ये राहुल नाहीत; परंतु पक्षातील बड्या नेत्यांना मोकळेपणाने बोलण्याची जी खुली सवलत दिली आहे, त्याचा नेमका उलट परिणाम सध्या दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांत अनेक प्रभारी नेत्यांना वेगवेगळ्या राज्यांत स्थानिक नेत्यांकडून टीकेला सामोरे जावे लागत आहे.

प्रदेशाध्यक्ष व विधिमंडळ पक्षाच्या नेत्यांसोबतच्या बैठकीनंतर राजधानी दिल्लीत राहुल गांधींच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री शीला दीक्षित व जयप्रकाश अग्रवाल यांच्यातील गटबाजी उफाळली आहे. मुख्यमंत्री समर्थक आमदार प्रदेशाध्यक्षांविरोधात उघड नाराजी बोलून दाखवत आहेत. मध्य प्रदेशातही कांतीलाल भुरिया-विधिमंडळ नेते अजय सिंह व केंद्रीय मंत्र्यांमध्ये वादावादी सुरू आहे. हरियाणात मुख्यमंत्री भूपिंदसिंह हुड्डा यांच्याविरोधात मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्री विजय बहुगुणा यांना तर राहुल गांधींनी स्वत:च फटकारले आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात राज्यात असंतोष वाढत आहे.

महाराष्‍ट्रातही तशीच अवस्था
राहुल गांधी शनिवारी मुंबईत आले होते. या दौ-यात नाराज पदाधिका-यांनी युवराजांसमोर सरकारबाबत तक्रारींचा पाढा वाचला होता. मंत्री आमच्या तक्रारी ऐकत नाहीत, राज्य सरकार, पक्ष संघटनेत समन्वय नाही, मुंबई प्रदेशाध्यक्षासह महामंडळावरील रखडलेल्या नियुक्त्यांबाबत पदाधिका-यांनी राहुल यांच्यासमोर गा-हाणे गायिले. या बैठकीत पक्षाचे राज्य प्रभारी मोहन प्रकाश यांच्यावरही टीका झाली. तेव्हा आधी पक्ष मजबूत करा, वाद मिटवा, असा सल्ला राहुल यांनी दिला. गटबाजी संपवण्यासाठी कोणता फॉर्म्युला वापरणार याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.