आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अफजलच्‍या फाशीनंतर सोपोरमध्‍ये हिंसा तर गुजरातमध्‍ये होळी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- संसदेवर 2001मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील प्रमुख आरोपी अफजल गुरु याला शनिवारी सकाळी फाशी देण्‍यात आली. सुत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, सकाळी 7.30 वाजताच्‍या सुमारास अफजलला तिहार तुरुंगात फाशी देण्‍यात आली. तर सकाळी 8 वाजता त्‍याला मृत घोषित करण्‍यात आले. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी अधिकृत माहिती दिली. अफजलच्‍या फाशीबाबत प्रचंड गोपनियता राखण्‍यात आली. अफजलला फाशी दिल्‍यानंतर जम्‍मू आणि काश्मिरमध्‍ये संचारबंदी लागू करण्‍यात आली आहे. तसेच मोबाईल, इंटरनेट आणि दुरचित्रवाणी सेवा बंद करण्‍यात आली आहे. ही बंदी 3 दिवस लागू राहील, असे स्‍पष्‍ट करण्‍यात आले आहे.

अफजल गुरुला फाशी दिल्‍यानंतर हुरियत कॉन्‍फरन्‍सने बदला घेण्‍याची भाषा केली आहे. भारताला याचे परिणाम भोगावे लागतील, असे हुरियतच्‍या नेत्‍यांनी सांगितले. एकप्रकारे हुरियतच्‍या नेत्‍यांनी भारताविरुद्ध युद्धाचीच घोषणा केली. काश्मिरमध्‍ये संचारबंदी लागू करण्‍यात आल्‍यानंतरही सोपोरमध्‍ये काही ठिकाणी निदर्शने करण्‍यात आल्‍याचे वृत्त आहे. त्‍यात दोन जण जखमी झाल्‍याची माहिती आहे. हुरियत नेते मीरवाईज उमर फारुख आणि सैय्यद अली शाह गिलानी यांना दिल्‍लीतच नजर कैदेत ठेवण्‍यात आले आहे. काश्मिरमध्‍ये एकीकडे निदर्शने करण्‍यात येत आहेत. तर दुसरीकडे अहमदाबादमध्‍ये जल्‍लोष करण्‍यात आला. लोकांनी होळीप्रमाणेच रंग उधळून अफजल गुरुच्‍या फाशीवर आनंद व्‍यक्त केला.

दरम्‍यान, अफजल गुरुचा भाऊ मोहम्‍मद यासीन गुरु याने अफजलचा मृतदेह देण्‍याची मागणी केली आहे. स्‍थानिक पोलिस अधिका-यांच्‍या मदतीने त्‍याने भारताचे राष्‍ट्रपती आणि गृहमंत्र्यांना अफजल गुरुचा मृतदेह कुटुंबियांना देण्‍यासाठी अर्ज केला आहे. अफजल गुरुचा मृतदेह तिहार तुरुंगातच अज्ञात ठिकाणी दफन करण्‍यात आला आहे.

अफजल गुरुच्‍या फाशीनंतर काश्मिरच्‍या खो-यात सज्‍ज राहण्‍याचा इशारा भारतीय सैन्‍याला दोन दिवसांपुर्वीच देण्‍यात आला होता.