आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

40 मिनिटांतच पाच दहशतवाद्यांचा खात्मा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

13 डिसेंबर 2001 रोजी पाकिस्तानच्या अतिरेक्यांनी भारतीय संसदेवर हल्ला चढवला. भारत व भारतीय नागरिकांचे मनोबल खच्ची करणे हा लष्कर-ए-तोयबा व जैश-ए-मोहंमदच्या या अतिरेक्यांचा मुख्य उद्देश होता. मात्र, भारतीय सुरक्षा जवानांनी त्यांचे मनसुबे उधळून लावले. आपल्या शूर जवानांनी जिवाची बाजी लावत 40 मिनिटांत अतिरेक्यांचा खात्मा केला. याचा घटनाक्रम पुढीलप्रमाणे...

सकाळी 11.20 वाजता : संसदेत शवपेटी घोटाळ्याच्या मुद्द्यावरुन वातावरण तापले होते. गोंधळामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज स्थगित करण्यात आले. काही खासदार बाहेर गप्पा मारत होते तर काही आत होते. उपराष्ट्रपती कृष्णकांत घरी जाण्याच्या तयारीत होते. त्यांच्या गाडीचा ताफा गेट क्रमांक 11 जवळ आला होता.

पांढ-या अ‍ॅम्बेसेडरमधून आले अतिरेकी : त्या क्षणी सुरक्षा जवानांना पांढ-या रंगाची अ‍ॅम्बेसेडर कार 11 क्रमांकाच्या गेटजवळ येताना दिसली. पाहता-पाहता गेट क्रमांक 11 ओलांडून गेट क्रमांक 12 जवळ ती पोहोचली. एएसआय जीतराम या कारच्या मागे धावले. यादरम्यान कार उपराष्ट्रपतींच्या ताफ्याला जाऊन धडकली.

शूर जवानांनी कार रोखली : जीतरामने धावत जाऊन चालकाची कॉलर पकडली. त्यांना कारमध्ये लष्करी गणवेशातील जवान दिसले. चालकाने एएसआय चालकाला धमकात म्हटले, बाजूला सरक, अन्यथा गोळी घालीन. लष्कराच्या वेशात दुसराच कोणी असल्याची जाणीव त्यावेळी एएसआयला झाली. जीतराम यांनी रिव्हॉल्व्हर काढले व वेगात पुढे सरकले. दुसरीकडे सुरक्षा रक्षक जे.पी. यादवने संदेश देत सर्व दरवाजे बंद केले. चालक गडबडीत होता. अ‍ॅम्बेसेडर रस्त्यालगतच्या दगडांवर जाऊन आदळली व कारमधून पाच जण उतरले. उतरताच त्यांनी तार व स्फोटके पेरण्यास सुरुवात केली.

एएसआय जीतरामने एका अतिरेक्यावर गोळीबार केला. अतिरेक्याच्या पायाला गोळी लागली. प्रत्युत्तरात अतिरेक्याने केलेल्या गोळीबारात जीतराम शहीद झाले.

गोळीबारामुळे संसद भवन हादरले : संसद भवनात गोळीबाराचा आवाज घुमू लागला. दहशतवादी सतत ग्रेनेडने हल्ला करत होते. दुसरीकडे सुरक्षा जवानांनी कारवाई सुरू केली. त्यांनी खासदार व प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सुरक्षित ठिकाणी नेले. त्यावेळी 100 हून अधिक खासदार बाहेर होते. दूरध्वनी सेवा बंद करण्यात आली होती.

अतिरेक्यांचा खात्मा : दरवाजा क्रमांक नऊ बंद असल्याचे पाहताच अतिरेकी पाच क्रमांकाच्या दरवाजाकडे पळाले. मात्र, त्याआधी जवानांनी तीन अतिरेक्यांना नऊ क्रमांकाच्या दरवाजाजवळ ठार केले. एक अतिरेकी गे्रनेड फेकत पाच क्रमांकाच्या दरवाजाजवळ आला. त्याला तेथेच ठार करण्यात आले. पाचवा अतिरेकी गेट क्रमांक पाचजवळ येत होता. त्याने शरीराला स्फोटके बांधली होती. आतमध्ये घुसून स्फोट घडवण्याचा त्याचा उद्देश होता. मात्र, गेट क्रमांक एकपर्यंत पोहोचण्याआधी त्याला गोळी लागली. स्फोटात तो मारला गेला.

कारमध्ये 30 किलो आरडीएक्स : पांढ-या रंगाच्या कारमध्ये जवळपास 30 किलो आरडीएक्स व शस्त्रे होती. खाण्या-पिण्याचे साहित्य होते. त्यामुळे खासदारांना ओलिस ठेवून आपली मोहीम लांबवण्याचा त्यांचा उद्देश होता हे स्पष्ट झाले.